
टोकियो: पॅरालिम्पिक २०२० क्रीडा स्पर्धेत सोमवार भारतासाठी पदकवार ठरला. भारतीय खेळाडूंनी एकापाठोपाठ एक अशा पदकांची कमाई करत देशाचे नाव उंचावले. सोमवारी सकाळी सर्वप्रथम नेमबाज अवनीने सुवर्णपदक जिंकून दिले. त्यानंतर थाळीफेकमध्ये योगेश कठुनियाला रौप्य मिळाले. या शानदार सुरुवातीनंतर भालाफेकमध्ये भारताने डबल धमाका केला. वाचा- २००४ च्या अथेन्स आणि २०१६च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या देवेन्द्र झाझडियाने रौप्य तर सुंदरसिंग गुर्जर याने कांस्यपदक जिंकले. या दोन पदकामुळे भारताने आज एका दिवसात चार पदक जिंकली आहेत. तर भारताच्या एकूण पदकांची संख्या सातवर पोहोचली आहे. वाचा- पदकतालिकेत भारत १ सुवर्ण, ४ रौप्य आणि २ कांस्यपदकासह एकूण सात पदक मिळून ३४व्या स्थानावर आहे. काल रविवारी भारताच्या टेबलटेनिसपटू भविनाबेन पटेलने रौप्यपदकाची कमाई केली, तर अॅथलेटिक्समध्ये निशादकुमारने लांबउडी टी ४७ या प्रकारात आशियाई विक्रमासह रौप्यपदकावर नाव कोरले होते. रविवारी भारताला आणखी एक पदक मिळाले होते. पण ते पदक रोखण्यात आले आहे. थाळीफेकमध्ये भारताच्या विनोद कुमार यांनी १९.९१ मीटर लांब थ्रो फेकला आणि आशियाई विक्रमासह तिसरे स्थान मिळवले. काही देशांनी त्यावर आक्षेप घेतल्यामुळे हे पदक रोखण्यात आले आहे.