इंधन दिलासा ; सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांकडून डिझेल दर कपात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 20, 2021

इंधन दिलासा ; सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांकडून डिझेल दर कपात

https://ift.tt/3j2cfvD
मुंबई : कच्च्या तेलाच्या किमतीत महिनाभरात १० डॉलरची घसरण झाल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेल दर कमी करण्याचा सपाटा लावला आहे. सलग तिसऱ्या दिवशी कंपन्यांनी डिझेलच्या किमतीत कपात केली. आज शुक्रवारी देशभरात डिझेल २० पैशांनी स्वस्त झाले. कंपन्यांनी बुधवारी तब्बल चार महिन्यानंतर कमी केला होता. त्यानंतर काल गुरुवारी देखील डिझेल २० पैशांनी स्वस्त केले होते. आज पुन्हा एकदा कंपन्यांनी डिझेलमध्ये २० पैशांची कपात केली. तीन सत्रात डिझेल ६० पैशांनी स्वस्त झाले आहे. तर पेट्रोलचा भाव सलग ३४ व्या दिवशी स्थिर आहे. आजच्या दर कपातीनंतर मुंबईत आजचा डिझेलचा भाव ९६.८४ रुपये इतका झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.२७ रुपये झाला आहे. चेन्नईत ९३.८२ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.३७ रुपये प्रती लीटर इतका खाली आला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.०६ रुपये झाला असून बंगळुरात डिझेल ९४.६६ रुपये झाला आहे. आज शुक्रवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपयांवर कायम आहे. आज दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपयांवर स्थिर आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.४७ रुपये इतका आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी तामिळनाडू राज्य सरकारने पेट्रोलवरील शुल्क ३ रुपयांनी कमी केले होते. त्यामुळे आजच्या घडीला चेन्नईत सर्वात कमी दरात पेट्रोल मिळत आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलातील घसरण सुरूच आहे. गुरुवारी डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ६३.७९ डॉलरवर बंद झाला. त्यात १.६७ डॉलरची घसरण झाली. तर ब्रेंट क्रूडचा भाव ६६.४५ डॉलरवर स्थिरावला.त्यात १.७८ डॉलरची घसरण झाली होती.