
: लंडन : क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. भारतीय क्रिकेट संघातील यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे. ३७ धावांची खेळी करत त्याने भारतीय संघाचा माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा विक्रमही मोडला आहे. डावखुरा फलंदाज असलेल्या पंतने परदेशात १ हजार कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. यासह पंत परदेशात सर्वात वेगवान १ हजार कसोटी धावा करणारा भारतीय यष्टीरक्षक बनला आहे. त्याने २९ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. पंतने भारतात कसोटी सामने खेळताना ४५४ धावा केल्या आहेत. धोनीचा विक्रम टाकला मागे यापूर्वी हा विक्रम भारताचा माजी यष्टीरक्षक कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. धोनीने ३२ डावांमध्ये १ हजार धावा केल्या होत्या, तर फारूक इंजिनिअर यांनी ही कामगिरी करण्यासाठी ३३ डाव घेतले होते. जडेजासोबत महत्वपूर्ण भागीदारी पंतने ५८ चेंडूत ५ चौकार लगावत ३७ धावा केल्या. त्याने रविंद्र जडेजासोबत सहाव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. के.एल. राहुलचे सहावे कसोटी शतक आणि रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३६४ धावा फटकावल्या आहेत. राहुलची शतकी खेळी राहुलने २५० चेंडूत १२९ धावा केल्या, तर रोहित शर्माने १४५ चेंडूत ८३ धावांचे योगदान दिले. कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. तो ४२ धावांवर बाद झाला. रोहित आणि राहुलने पहिल्या विकेटसाठी १२६ धावांची सलामी दिली. त्यानंतर राहुलने कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताला ३५० चा टप्पा पार करता आला.