
मुंबईः लशीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. पण ज्या व्यक्तींचा अद्याप लसीचा एकही डोस पूर्ण झाला नाहीये त्यांच्या लोकल प्रवासास अडथळा निर्माण झाला आहे. या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या तीन महिन्यात संपूर्ण मुंबईचे होईल, असा विश्वास पालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत सध्या दररोज एक लाख ते ८० हजारापर्यंत लसीकरण केले जात आहे. जास्त प्रमाणात डोस मिळाल्यास दीड लाखांचाही टप्पा गाठला जात आहे. त्यामुळं सध्या मिळणाऱ्या डोसमध्ये नोव्हेंबरअखेरपर्यंत सर्व मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण होईल, अशी माहिती इकबाल चहल यांनी दिली आहे. मुंबईत १८ वर्षांवरील एकूण ९० लाख जण असून आतापर्यंत ७६ लाख डोस देण्यात आले आहेत. तर, १९ लाख जणांनी दुसरा डोस घेतला आहे. पालिका, सरकारी आणि खासगी अशा ४३२ लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. १८ वर्षांवरील ९० लाख जणांनी एकूण १ कोटी ८० लाख डोसची गरज आहे. यातील आतापर्यंत मोठ्या प्रमाणत लसीकरण करण्यात आल्यामुळं सध्याचे वेगाने नोव्हेंबरअखेरपर्यंत सर्वांचे लसीकरण पूर्ण होईल, असं इकबाल चहल यांनी म्हटलं आहे. लसीकरण झाल्यानंतर १४ दिवसांनी मुंबईकरांना लोकल प्रवास करता येणार आहे. यावरही इकबाल चहल यांनी भाष्य केलं आहे. करोनाच्या दुसऱ्या डोसनंतर १४ दिवसांनी मानवी शरिरात करोना विषाणू प्रतिबंधक रोगप्रतिकारक्षमता निर्माण होते. म्हणूनच लोकल प्रवासाच्यी अटीमध्ये दोन डोसनंतर १४ दिवसांचे अंतर ठरवण्यात आलं आहे.