
मुंबई- छोट्या पडद्यावर प्रचंड गाजणारी मालिका '' मध्ये नवनवे ट्विस्ट येत आहेत. मालिकेची रंजकता वाढवण्यासाठी करण्यात येणाऱ्या या प्रयत्नांना यशही मिळत आहे. अशातच नव्याने दाखवण्यात आलेल्या प्रोमोमध्ये अनिरुद्ध ऐन लग्नाच्या दिवशी गायब झाला आहे. संजना या घटनेसाठी अरुंधतीला जबाबदार धरत तिच्याजवळ अनिरुद्धची चौकशी करत आहे. पण त्याचा फारसा काही उपयोग होत नाहीये. तर दुसरीकडे लग्नासारख्या महत्वाच्या दिवशी अनिरुद्ध नेमका गेला कुठे, असा प्रश्न संजनाप्रमाणे प्रेक्षकांनाही पडला आहे. यावर उपाय म्हणून मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते यांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. मिलिंद यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्टर चक्क दोनदा पोस्ट करत चाहत्यांकडे अनिरुद्धला शोधण्याचं आवाहन केलं आहे. मिलिंद यांनी शेअर केलेल्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर हास्याचं वातावरण आहे. हे भन्नाट पोस्टर खरं तर एका युझरने बनवलेला मीम आहे. ज्यावर अनिरुद्ध देशमुख हरवला आहे, असं लिहिलं आहे. बोरिवली, समृद्धी बंगला असा पत्ता देण्यात आला आहे. संपर्कासाठी संजनाचा नंबरही देण्यात आला आहे. रंग, उंची लिहून कुणाला दिसल्यास त्वरित संजनाला संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सोबतच माहिती देणाऱ्याला लग्नाला बोलवलं जाईल, असंही लिहिलं आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती यांचा घटस्फोट झाल्यानंतर सध्या मालिकेत अनिरुद्ध आणि संजना यांचं लग्न दाखवण्यात येणार आहे. एकीकडे संजना लग्नासाठी उतावीळ झाली आहे. तर दुसरीकडे अनिरुद्ध संजना लग्नाची इतकी घाई का करत आहे या विवंचनेत आहे. आता अनिरुद्ध सापडणार की मालिकेत आणखी नवा ट्विस्ट येणार हे लवकरचं कळेल.