
म. टा. विशेष प्रतिनिधी, करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यातून सावरत असतानाच तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने तयारी सुरू केली असून महालक्ष्मी येथील जम्बो करोनाकेंद्र नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महालक्ष्मी जम्बो करोनाकेंद्रात २०५ आयसीयू आणि गंभीर करोनाबाधित रुग्णांवरील उपचारांसाठी २५० असे एकूण ४५५ खाटा उपलब्ध केल्या जातील. त्यासाठी पालिकेकडून ४४ कोटी ८३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. रेसकोर्सच्या पार्किंग क्षेत्रात हे करोनाकेंद्र बांधण्यात येणार असून ऑक्सिजन पुरवठा करणारी आणि आगीची आगाऊ सूचना देणारी यंत्रणा आदी सुविधा येथे असतील. तसेच, या सर्व कामांसाठी सल्लागारही नेमण्यात येणार असून त्यासाठी १३ लाख रुपये मोजण्यात येणार आहेत. महालक्ष्मी रेसकोर्सवरील करोनाकेंद्रामुळे नायर, केईएम, सायन रुग्णालयावरील ताण कमी होणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.