कंपाउंडर बनले डॉक्टर; मुंबईत क्लिनिकवर छापे, तीन जण अटकेत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 21, 2021

कंपाउंडर बनले डॉक्टर; मुंबईत क्लिनिकवर छापे, तीन जण अटकेत

https://ift.tt/3uaeb9D
म. टा. खास प्रतिनिधी, पोलिसांच्या कारवाईनंतरही मुंबईत बोगस डॉक्टरांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच्या गोवंडी येथील कारवाईनंतर पोलिसांनी घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीमधील काही क्लिनिकवर छापे टाकले. या छाप्यामध्ये कोणत्याही पदवी अथवा प्रशिक्षणाशिवाय रुग्णांवर उपचार करणाऱ्या तीन डॉक्टरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. करोनाच्या संसर्गामुळे सर्वसामान्य लोक हवालदिल झाले असतानाच बोगस डॉक्टरांनी मात्र झोपडपट्ट्यांमध्ये दवाखाने थाटल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. रमाबाई कॉलनीमध्ये लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन बोगस डॉक्टरांनी व्यवसाय थाटला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ७चे प्रभारी मनीष श्रीधनकर यांना मिळाली. या माहितीची शहानिशा करण्यासाठी रुग्ण बनण्याचे नाटक करण्यात आले. महिला पोलिस निरीक्षक प्रिया थोरात, सहायक निरीक्षक महेंद्र दोरकर यांच्यासह पोलिसांच्या पथकाने पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने वारे क्लिनिक, धनीस्था क्लिनिक आणि सरोज क्लिनिक या तीन दवाखान्यांवर छापा टाकला. एक महिला आणि दोन पुरुष डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांचा छापा पडताच या डॉक्टरांनी वैद्यकीय प्रमाणपत्रे दाखवली. परंतु महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन यांच्याकडे या प्रमाणपत्रांची कोणतीच नोंद नसल्याचे दिसून आले. या तिन्ही डॉक्टरांविरोधात पंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या डॉक्टरांच्या दवाखान्यातून पोलिसांनी औषधे, इंजेक्शन तसेच इतर साहित्य हस्तगत केले आहे.