कोकणासाठी राज्य सरकारकडून ३२०० कोटी; कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम राबवणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 16, 2021

कोकणासाठी राज्य सरकारकडून ३२०० कोटी; कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम राबवणार

https://ift.tt/2Xp17RM
‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः कोकणामध्ये ' आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम' राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यात झालेले नुकसान विचारात घेऊन 'कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प' या नावाने कोकणासाठी हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे तीन हजार २०० कोटीपैकी दोन हजार कोटी रुपये राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीतून खर्च करण्यास आणि उर्वरित १२०० कोटी रुपये पुढील चार वर्षांत राज्याच्या निधीतून उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पात क्षमता बांधणी आणि पूर्वतयारी, तसेच सौम्यीकरण निधीच्या योग्य व सर्वसमावेशक वापरासाठी चार वर्षांसाठी बृहत् आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प नियंत्रण गट व सल्लागारांची नियुक्ती करण्यात येईल. त्यासाठी होणारा खर्च क्षमता बांधणी व पूर्वतयारीसाठी उपलब्ध निधीच्या सात टक्के मर्यादेत व सौम्यीरकणासाठी उपलब्ध निधीच्या तीन टक्के मर्यादेत राज्य योजनेमधून विभागास मंजूर होणाऱ्या तरतूदीतून खर्च करण्यास मान्यताही देण्यात आली. मेंढीपालन सहकारी संस्थेसाठी मुद्रांक शुल्क माफ सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील सातारा मेंढीपालन व लोकर प्रक्रिया सहकारी संस्थेच्या जमीन खरेदी व्यवहारातील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सातारा मेंढीपालन व लोकर प्रक्रिया सहकारी संस्थेच्या आणि संबंधित मूळ शेतमालक यांच्या दरम्यान होणाऱ्या जमीन हस्तांतरणासाठी व्यवहार होणार आहे. या व्यवहारातील मुद्रांक अधिनियमानुसार द्यावे लागणारे सुमारे सहा लाख ६६ हजार ४७४ रुपयांचे मुद्रांक शुल्क, तसेच या व्यवहारासाठी नोंदणी नियमानुसार द्यावे लागणारे शुल्कही माफ करण्याचा निर्णय बुधवारच्या बैठकीत घेण्यात आला आहे.