सचिन वाझे १०० दिवस फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये होता, तिथूनच हलवली मनसुखच्या हत्येची सूत्रे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 9, 2021

सचिन वाझे १०० दिवस फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये होता, तिथूनच हलवली मनसुखच्या हत्येची सूत्रे

https://ift.tt/3nhdMAM
म. टा. प्रतिनिधी, मुंबई पैशाने भरलेली बॅग, त्याचवेळी पंचातारांकित हॉटेलमधील १०० दिवसांचे बुकिंग व हिरन यांच्या हत्येनंतर आरोपींचा नेपाळ दौरा असे विविध कंगोरे प्रकरणात समोर येत आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणने (एनआयए) या संदर्भात केलेल्या आरोपपत्रात या बाबींचा खुलासा झाला आहे. मुकेश अंबानी यांच्या अॅन्टिलिया या निवासस्थानाजवळ गाडीत स्फोटके ठेवताना बडतर्फ सह पोलिस निरीक्षक सचिन वाझे याने सुनियोजित कट आखला होता. अशाप्रकारे अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवायची, त्यानंतर स्फोटके ठेवणाऱ्याची बनावट चकमकीत हत्या करायची व त्यातून 'सुपरकॉप' ही ओळख मिळवायची, असा वाझेचा डाव होता. हा कट यशस्वी झाला असता तर अन्य काही उद्योजकांना वाझेने असेच लक्ष्य करण्याचे ठरवले होते. त्याआधारे त्यांच्याकडून खंडणी उकळायची व तो पैसा गुन्ह्यांसाठी वापरायचा, असा वाझेचा डाव होता, असे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे. वाझेने यासाठी यांच्यासारख्या कमजोर व्यापाऱ्याचा वापर केला. परंतु तो डाव उधळला जात असल्याचे दिसून येताच हिरन यांचे सुनियोजित अपहरण केले. त्यांची हत्या करण्यासाठी निवृत्त पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना कटात सामावून घेतले गेले. हिरन यांची हत्या करण्यासाठी शर्मा यांनी संतोष शेलार यांना सुपारी दिली. ही सुपारी देण्यासाठी बॅग भरून शर्मा व शेलार यांना पैसे देण्यात आले, असेही 'एनआयए'च्या तपासात समोर आले असून तसे आरोपपत्रात नमूद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. हिरन यांची हत्या केल्यानंतर आरोपींना नेपाळ येथे धाडण्यात आले. जवळपास चार ते सहा दिवस आरोपी नेपाळ परिसरात फिरत होते व त्यानंतर ते परतले. परतल्यावर त्यांनी वाझेच्या सांगण्यावरून आधी सर्व पुरावे नष्ट केले, असे 'एनआयए'ने आरोपपत्रात नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले. हा सर्व कट शिजत असताना वाझे नरिमन पॉइंट येथील एका पंचातारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. त्या हॉटेलमधील एक कक्ष तब्बल १०० दिवसांसाठी आरक्षित करण्यात आला होती, असेही आरोपपत्रात म्हटले आहे. जिलेटिनचे रहस्य कायम अॅन्टिलियाजवळ कारमध्ये गाडीत सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या नेमक्या आल्या कुठून, हे रहस्य मात्र कायम आहे. या जिलेटिनच्या कांड्या नेमक्या कुठून आल्या, कोणी आणल्या, त्या कोणी पुरवल्या याबाबत मात्र 'एनआयए'ने माहिती दिली नाही.