मुंबई : भांडवली बाजारातील तेजीने कमॉडिटी बाजारावर मात्र अवकळा आणली आहे. सलग तिसऱ्या सत्रात सोन्याचा किमतीत घसरण पाहायला मिळाली. आज कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव १०९ रुपयांनी कमी झाला. चांदीमध्ये २६० रुपयांची घसरण झाली. याआधीच्या सत्रात शुक्रवारी सराफा बाजारात सोने आणि चांदीमध्ये मोठी पडझड झाली होती. सोन्याचा भाव ११३० रुपयांनी कमी झाला होता आणि तो ४५२०७ रुपयांवर स्थिरावला होता. तर गुरुवारी सोने ४६३३७ रुपयांवर होते. शुक्रवारी चांदीमध्ये देखील ७०८ रुपयांची घसरण झाली आणि तो ६०१८३ रुपयांवर स्थिरावला होता. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव ४५९१५ रुपये आहे. त्यात ६९ रुपयांची घट झाली आहे. तत्पूर्वी आज सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव ४६८८० रुपयांपर्यंत घसरला होता. सध्या एक किलो ५९७१३ रुपये आहे. त्यात २७९ रुपयांची घसरण झाली आहे. Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५३९० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४६३९० रुपये आहे. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५५५० रुपये इतका झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४९६९० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४३५५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७५१० रुपये आहे. त्यात १८० रुपयांची घसरण झाली. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५६५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८३५० रुपये आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह धोरणाच्या बैठकीपूर्वी बाजार सावध राहतील अशी अपेक्षा आहे कारण अमेरिकेच्या ग्राहकांच्या किंमतीतील अपेक्षेपेक्षा कमी वाढीमुळे मालमत्ता खरेदी कार्यक्रम कमी होण्याची शक्यता आहे. फेडरल ओपन मार्केट कमिटीची बैठक २१ आणि २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. जागतिक बाजारात सोन्याचा भाव १७६२ डॉलर प्रती औंस असून चांदीचा भाव २२.९५ डॉलर आहे.