मुंबईः 'मराठी एकजूट व मराठी लढ्याचा बेळगावात () दारूण पराभव झाल्याचा धक्का सगळ्यांनाच बसला आहे, असं सांगतानाच सीमा बांधवांचा लढा सुरूच राहील, मराठी एकजूट पुन्हा उसळून येईल. बेळगावच्या पराभवातून एक धडा घ्यावाच लागेल. आपले शत्रू आणि वैरी आपल्याच घरात आहे. एकीची वज्रमूठ सुटली की गद्दारांचे फावते,' अशा शब्दांत शिवसेनेनं () संताप व्यक्त केला आहे. बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारूण पराभव झाला. तर, भाजपनं बहुमत मिळवत बेळगावात सत्ता काबीज केली आहे. या निकालावर खासदार संजय राऊत यांनीही नाराजी व्यक्त केली होती. तर, आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. 'शिवरायांच्या काळात सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे हे निपजले होतेच. औरंगजेबाने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अटक केल्याचे वृत्त धडकताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात व चिंतेत बुडाला होता, पण महाराजांच्या अटकेनेही आनंद मानून, गोडधोड वाटणारा एक वर्ग तेव्हाही महाराष्ट्रात होताच. त्याच प्रवृत्तीचे लोक बेळगाव महापालिका निवडणुकीतील मराठी पराभवाचा आनंद साजरा करीत आहेत. मराठीजनांचे शाप व हुतात्म्यांचे तळतळाट त्यांना लागतील,' असा संताप शिवसेनेनं व्यक्त केला आहे. 'मराठी माणूस संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या कर्मभूमीत पराभूत झाला म्हणून महाराष्ट्रात फटाके वाजवले गेले, हे जास्त वेदनादायक आहे. क्रिकेटच्या सामन्यात पाकिस्तान जिंकताच भेंडीबाजारातील काही भागात पूर्वी फटाके फुटत होते. तसलेच दळभद्री कृत्य बेळगावच्या निकालाने घडले आहे,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. 'महाराष्ट्र एकीकरण समितीस पाच जागाही जिंकता आल्या नाहीत. याचा आनंद महाराष्ट्राला होऊच शकत नाही. बेळगाव महानगरपालिकेवरील भगवा उतरवून पालिका बरखास्त केली तेव्हा साधा निषेधही न करणारे भाजपचे महाराष्ट्रातील पुढारी आज 'भगवा फडकला हो...' म्हणून हर्षवायूने बेभान होत गोडधोड वाटत फिरत असतील तर संयुक्त महाराष्ट्राच्या १०५ हुतात्म्यांचा तो अपमान आहे,' असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. 'बेळगावात शिवसेना कधीच लढली नाही. सीमा आंदोलनात सहभागी असलेले शरद पवारही कधी बेळगाव निवडणुकीच्या आखाड्यात उतरले नाहीत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारीही कधी सीमा बांधवांशी बेईमानी करताना आढळले नाहीत. प्रत्येकाने आपापल्या परीने सीमाभागातील मराठी बांधवांना बळ देण्याचेच प्रयत्न केले, पण बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधवांची ती एकजूट आज उरली आहे काय?, असा सवाल करतानाच एक निवडणूक हरले म्हणून लढा संपत नाही. जेथे भाषा, संस्कृती व अस्मितेचा प्रश्न येतो तेथे मराठी माणूस वाघाच्या काळजाने लढतच असतो. शिवसेनेने बेळगावच्या लढ्यासाठी ६९ हुतात्म्यांची आहुती दिलीच आहे. शिवसेनाप्रमुखांनी या कार्यासाठी तीन महिन्यांचा तुरुंगवासही भोगला, म्हणूनच बेळगावातील मराठी एकजुटीच्या पराभवाने शिवसेना, महाराष्ट्राची जनता अस्वस्थ झाली आहे,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.