दहशतवाद्यांचे दाऊदशी संबंध; एटीएस प्रमुखांनी दिली माहिती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 16, 2021

दहशतवाद्यांचे दाऊदशी संबंध; एटीएस प्रमुखांनी दिली माहिती

https://ift.tt/3nBFubr
एटीएस प्रमुखांनी दिली माहिती म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा मोठा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावल्यानंतर त्यातील एका दहशतवाद्याचा डी-कंपनीशी संबंध असल्याचे समोर आले आहे. याबाबत राज्याचे दहशतवादविरोधी पथक प्रमुख विनीत अग्रवाल यांनी बुधवारी माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या दशतवाद्यांमध्ये एक मुंबईतील धारावी येथे राहणारा असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिली. या दहशतवाद्यांचा गर्दीच्या ठिकाणी आणि लोकलमध्ये स्फोट घडवण्याचा कट होता. याबाबत अग्रवाल यांनी माहिती देताना सांगितले की, 'दिल्ली पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे. त्यापैकी एक हा मुंबईतील धारावीचा असून त्याचे नाव जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असे आहे. त्याचे पाकिस्तानातील दाऊद टोळीशी संबंध असल्याबद्दलची माहिती उपलब्ध आहे. हा रेकॉर्ड जवळपास २० वर्षांपूर्वीचा आहे. शेखवर त्यावेळी पायधुनी पोलिस ठाण्यात गोळीबार आणि तोडफोड प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्याच्यावर शेखवर आमची करडी नजर होती. पण त्याच्या कटाबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती. ती केंद्रीय संस्थांकडे होती. त्यांच्याकडून ती माहिती दिल्ली पोलिसांना दिली गेली होती.' जान मोहम्मद एकटाच दिल्लीला निघाला होता. त्याने ९ सप्टेंबरला जाण्याचे त्याने ठरवले होते. मात्र त्याला त्या तारखेचे तिकीट मिळाले नाही. त्याने १० तारखेला पैसे पाठवले. त्याचे तिकीट निश्चित होत नव्हते. त्यानंतर त्याने १३ सप्टेंबरचे प्रतीक्षेतील तिकीट काढले आणि गोल्डन टेम्पल एक्सप्रेसने एस-६ या डब्यातून त्याने प्रवास सुरू केला. संध्याकाळपर्यंत त्याचे तिकीट निश्चित झाले, अशी माहितीही अग्रवाल यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात शेखसह दिल्ली पोलिसांनी ओसामा (२२), मुलचंद (४७), झिशान कमार (२८), मोहम्मद अबू बकार (२३), मोहम्मद अमिर जावेद (३१) यांना अटक केली आहे. एटीएसचे पथक दिल्लीला जाणार प्रवासादरम्यान तो कोटा येथे जेव्हा पोहोचला असता त्याला अटक करण्यात आली. मात्र जान मोहम्मद शेखकडे हत्यारे किंवा स्फोटके सापडली नाहीत. याबाबतची सर्व माहिती दिल्ली पोलिसांकडे आहे. आमचे एक पथक बुधवारी संध्याकाळी दिल्लीला रवाना झाली असून दिल्ली पोलिसांकडे असणारी माहिती आम्ही घेणार आहोत, असेही अग्रवाल यांनी सांगितले. तसेच आमच्याकडे असलेली माहितीही आम्ही दिल्ली पोलिसांना देणार आहोत. त्यानंतर हे प्रकरण पुढे कसे कसे जाते त्यावर आमचे लक्ष असेल, असेही ते म्हणाले.