पारनेला ईडी येईना म्हणून उपोषणाचा इशारा, कार्यकर्त्यांची सोमय्यांकडे धाव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 19, 2021

पारनेला ईडी येईना म्हणून उपोषणाचा इशारा, कार्यकर्त्यांची सोमय्यांकडे धाव

https://ift.tt/39jI2CK
अहमदनगरः उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अंमबजावणी संचालनालय (ईडी) पारनेर तालुक्यातील साखर कारखान्याच्या चौकशीसाठी येत नसल्याचा आरोप करून यासाठी पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासंबंधी त्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचीही भेट घेतली. सोमय्या यांनी लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालण्याचे आणि पारनेरला येण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. संशयस्पद विक्री व्यवहार झालेल्याच्या आरोपांच्या यादीत पारनेरच्या साखर कारखान्याचाही समावेश आहे. याच यादीतील सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखान्याशी संबंधीत चौकशी सुरू झाली. मात्र, पारनेरसंबंधी अद्याप हालचाली नाहीत. त्यामुळे यासाठी पाठपुरावा करणारे याचिकाकर्ते बबनराव कवाद, रामदास सालके आणि रामदास घावटे यांनी मुंबईच्या ईडीच्या कार्यालयात जाऊन यासंबंधीचे पत्र तेथील अधिकाऱ्यांना दिले. चौकशी सुरू झाली नाही तर २० ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांसह इडीच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर या कार्यककर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, माणिकराव जाधव व किरीच सोमय्या यांचीही भेट घेतली. सोमय्या यांनी लवकरच कारखाना कार्यस्थळावर येण्याचे आणि यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले. साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई झाली. ज्या मूळ तक्रारीवरून ही कारवाई होत आहे, त्या ज्येष्ठ समाजसेवक यांच्या तक्रारीत पारनेर कारखान्याच्या व्यवहाराचाही समावेश आहे. याशिवाय बचाव समितीमार्फतही स्वतंत्र पाठपुरावा सुरू आहे. पारनेर बचाव समितीने या कारखान्याच्या विक्रीत काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप करून याची चौकशी ईडीने करावी, अशी मागणी केलेली आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतरच चौकशी करण्यात येईल, अशी भूमिका त्यावेळी ईडीने घेतली होती. समितीने गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी दखल न घेतल्याने प्रकरण पुन्हा न्यायालयात गेले. पारनेर कारखाना विकणारी राज्य सहकारी बँक व तो विकत घेणारी खाजगी कंपनी क्रांती शुगर यांच्या व्यवहारात काळा पैसा वापरला असल्याचा संशय आहे. या खासगी कंपनीचे लेखा परीक्षण अहवालात दाखवलेले भांडवल आणि मालमत्ता पाहता हा कारखाना विकत घेण्यासाठी वापरलेल्या रकमेवर संशय निर्माण होतो. तसेच बँकेने हा कारखाना एकाच विक्री निविदेला कसा विकला? असा प्रश्न उपस्थित करून ही चौकशीची मागणी करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी खासदार विदुरा नवले यांच्या अधिपत्याखालील क्रांती शुगर या कंपनीने पारनेरचा कारखाना विकत घेतला आहे. त्यांना राज्यातील बड्या नेत्यांचे पाठबळ असल्याचाही आरोप आहे.