... तर एक एकर शेती बक्षीस म्हणून देणार; शेतकऱ्याची घोषणा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 17, 2021

... तर एक एकर शेती बक्षीस म्हणून देणार; शेतकऱ्याची घोषणा

https://ift.tt/2Z6j5cb
कोल्हापूर: ऊसाची एफआरपी तीन टप्प्यात देण्याबाबत राज्य सरकारने केंद्राकडे केलेली शिफारस वादग्रस्त ठरत आहे. केंद्रानेही एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला आहे. याला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह राज्यातील अनेक शेतकरी संघटनेने त्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने 'ही लढाई यशस्वी करणाऱ्या नेत्यास एक एकर बागायत शेती बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. नांदणी येथील रामगोंडा जनगोंडा पाटील या शेतकऱ्याच्या या घोषणेची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. ऊसाला एकरकमी एफआरपी ( रास्त व किफायतशीर दर ) द्यावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तरीही शेतकऱ्यांना ती दिली जात नाही. आजही देशातील विविध कारखान्यांनी अठरा हजार कोटींची एफआरपी दिली नाही. यासाठी शेतकरी संघटना लढत आहेत. एकीकडे ही लढाई सुरू असतानाच आता एफआरपीचे तीन तुकडे पाडण्याचा घाट घातला जात आहे. राज्य सरकारने तशी शिफारस केंद्राकडे केली आहे. त्याला मोठा विरोध झाल्यानंतर आता दोन टप्प्यात ती रक्कम देण्याचा प्रस्ताव पुढे करण्यात येत आहे. पण हा प्रस्तावही शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. यामुळे एकरकमी एफआरपी साठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. एकीकडे आंदोलनाचे रान उठवले जात असताना शिरोळ तालुक्यातील एका शेतकऱ्यांना या लढ्यास मोठे बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. एफआरपीचे तुकडे पाडण्याचा कायदा हा काळा कायदा असून या विरोधात जो आमदार व खासदार यशस्वी लढा देईल त्यास एक एकर बागायती शेत बक्षीस म्ह्णून देण्याची घोषणाच नांदणी येथील शेतकरी रामगोंडा पाटील यांनी केली आहे. राज्यातील २८८ आमदार व ४८ खासदारांपैकी कुणीही हे आव्हान स्वीकारावे असे आवाहन त्याने केले आहे. माजी खासदार राजू शेट्टी वगळून इतर कोणत्याही नेत्याने हे आव्हान स्वीकारून हा लढा यशस्वी केल्यास ही शेती देण्याचा शब्दच त्याने दिला आहे. त्याची ही घोषणा सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.