नवी दिल्ली: करोना व्हायरसचा नवीन प्रकार ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विदेशातून येणाऱ्या प्रवासांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नवीन मार्गदर्शक तत्त्वे १ डिसेंबरपासून लागू होणार आहेत. भारतात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. प्रवास करण्यापूर्वी एअर सुविधा पोर्टलवर नकारात्मक RT-PCR चाचणी अहवाल अपलोड करण्यासोबतच तुमचा मागील १४ दिवसांच्या प्रवासाचा तपशील सादर करावा लागणार आहे. करोनाच्या ऑमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे प्रभावित झालेल्या देशांतील प्रवाशांची आगमनानंतर करोना चाचणी केली जाईल. प्रवाशांना चाचणीच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना ७ दिवस होम क्वारंटाईन केले जाईल. ८ व्या दिवशी पुन्हा करोना चाचणी करावी लागेल, रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास पुढील ७ दिवस सेल्फ मॉनिटरिंग करावे लागेल, असे आरोग्य मंत्रालयाच्या नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. हाय रिस्क असलेले देश १. ब्रिटनसह युरोपियन देश २. दक्षिण आफ्रिका ३. ब्राझील ४. बांगलादेश ५. बोस्टवाना ६. चीन ७. मॉरिशस ८. न्यूझीलँड ९. झिम्बाब्वे १०. सिंगापूर ११. हाँगकाँग १२. इस्रायल आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये वरील १२ देशांचा हाय रिस्कमध्ये समावेश केला आहे. हाय रिस्क असलेल्या देशांव्यतिरिक्त इतर देशांतील प्रवाशांना विमानतळाबाहेर परवानगी दिली जाईल आणि त्यांना १४ दिवस स्वत: ची देखरेख करावी लागेल. एकूण उड्डाण प्रवाशांपैकी ५ टक्के प्रवाशांची आगमन झाल्यावर विमानतळावर RT-PCR चाचणी केली जाईल. विमानतळावर उपस्थित असलेले विमानतळ कर्मचारी एकूण प्रवाशांच्या पाच टक्के ( कोणताही प्रवाशाची रँडमली) चाचणी करू शकतात, असे नव्या सूचनांमध्ये म्हटले आहे.