कोल्हापूर : शहरात सायंकाळी फिरणाऱ्या वृद्ध व्यक्तीचे दागिने लुटल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सर्किट हाऊस ते धैर्यप्रसाद मंगल कार्यालय परिसरात घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. () पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी सेवेतून निवृत्त झालेले धुंडीराज छत्रे रोज सायंकाळी चालण्यासाठी जातात. मंगळवारी सायंकाळी ते धैर्यप्रसाद मंगल कार्यालय ते सर्किट हाऊस या रस्त्यावरुन चालत असताना मोटार सायकलवरुन एक तरुण त्यांच्यासमोर आला. आपण लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस असून या परिसरात तपास करत आहे. या परिसरात चोऱ्या वाढल्या असून त्याने छत्रे यांना त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि गळ्यातील गोफ काढण्यास सांगितलं. अंगठी आणि गोफ कागद्याच्या पुडीत गुंडाळून ती पुडी त्यांच्या ताब्यात दिली. पुडी बांधत असताना भामट्याने त्यांचे दागिने लांबवले. त्यानंतर तो चोरटा मोटार सायकलरवरुन निघून गेला. थोड्या वेळ्याने छत्रे यांनी खिशात ठेवलेली दागिन्यांची पुडी उघडून पाहिली असता त्यात सोन्याचे दागिने नसल्याचं लक्षात आलं. दरम्यान, आपल्या दागिन्यांची चोरी झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.