त्रिपुरातील घटनेवरुन अमरावतीत तणाव; गृहमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 14, 2021

त्रिपुरातील घटनेवरुन अमरावतीत तणाव; गृहमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

https://ift.tt/3cbyRWs
मुंबईः त्रिपुरातील हिंसाचाराविरोधात शुक्रवारी निघालेल्या निषेध मोर्चादरम्यान झालेल्या दगडफेकीचे तीव्र पडसाद उमटले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर, अमरावती शहरात व ग्रामीण भागात परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. त्रिपुरातील हिंसाचाराविरुद्ध धार्मिक संघटनांनी शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन केले. अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा समारोप झाल्यानंतर काहींनी दुकानांवर दगडफेक झाली. त्यामुळे वातावरण तापले होते. अमरावतीतील वाढता तणाव पाहता शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत अमरावतीतील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. 'अमरावतीत घडलेल्या हिंसाचारात कोणतीही जिवितहानी झालेली नाहीये. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच, भाजपकडून अमरावती शहरात बंदचे आवाहन करण्यात आले आहे. तिथेही परिस्थिती नियंत्रणात आहे,' असंही वळसे पाटील म्हणाले आहेत. 'या हिंसाचारामागे कोणाचा हात आहे का याची चौकशी केली जाईल. त्रिपुराच्या घटनेवरुन अमरावतीत निघालेल्या मोर्चाचीही चौकशी केली जाईल. तसंच, या हिंसाचारात झालेल्या नुकसानाचाही आढावा घेण्यात येणार आहे. अहवाल आल्यानंतर याबाबत अधिक माहिती देण योग्य ठरेल,' असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. रझा अकादमीवर कारवाई करण्याची मागणी भाजपकडून होत असल्याबाबत गृहमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'या हिंसाचारात रझा अकादमी असो किंवा अन्य कोणतीही संघटना, रॅलीमागील हेतू तपासला जाईल, याची आम्ही योग्य ती चौकशी करू. पण त्यावर आता बोलता येणार नाही,' असंही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. अमरावतीत संचारबंदी 'अमरावतीत चार दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच, इंटरनेट सेवाही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात येणार नाही, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.