
इस्लामाबादः शौर्य आणि पराक्रमाबद्दल भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन यांचा आणि वीरचक्र पुरस्काराने गौरव करण्यात आला. पण यामुळे पाकिस्तानला मिरची झोंबली आहे. ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांचा तिसऱ्या सर्वोच्च शौर्य पदकाने गौरव करण्यात आल्याने पाकिस्तानी मीडियामध्ये याची जोरदार चर्चा होतेय. २०१९ मध्ये अभिनंदन यांनी हवाई संघर्षादरम्यान पाकिस्तानचे F-16 हे लढाऊ विमान पाडले होते. यावेळी त्यांचे मिग-21 बायसन या विमानाला क्षेपणास्त्र लागल्याने ते विमान कोसळले. अभिनंदन पॅराशूटद्वारे खाली आले. पण पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्यानंतर त्यांना तीन दिवस पाकिस्तानमध्ये ओलीस राहावे लागले. पाकिस्तानी मीडियात अभिनंदन यांची चर्चा भारतीय हवाई दलाचे (IAF) पायलट अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र प्रदान करण्यात आले आहे. वीरचक्र हा परमवीर चक्र आणि महावीर चक्रानंतरचा तिसरा सर्वोच्च युद्धकालीन शौर्य पुरस्कार आहे. अभिनंदन यांना फेब्रुवारी २०१९ मध्ये पाकिस्तानी F-16 विमान पाडल्याने शौर्य दाखवल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे. मात्र, भारताचा हा दावा पाकिस्तानने फेटाळून लावला. एवढेच नव्हे तर सैन्य, स्वतंत्र निरीक्षक तसेच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही तो फेटाळला, असे पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने लिहिले आहे. शेरी रहमान यांना आठवला 'चहा' पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (PPP) उपाध्यक्ष शेरी रहमान यांनी ट्विट केले. "विडंबना आहे का? पाकिस्तानी कोठडीत चहा प्यायल्याबद्दल पुरस्कार?, असे रहमान म्हणाल्या. इम्रान खान यांच्या डिजिटल मीडिया सल्लागारानेही ओकली गरळ पंतप्रधान इम्रान खान यांचे डिजिटल मीडिया सल्लागार अर्सलान खालिद यांनी एक पाऊल पुढे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय मीडियावर निशाणा साधला. "खरंच, मला अभिनंदनबद्दल खूप छान वाटतं. फक्त पंतप्रधान मोदी आणि भारतीय मीडियाने पराभव स्वीकारण्यास नकार दिल्याने अभिनंदनला दर दुसऱ्या महिन्याला पूर्ण एपिसोडची आठवण करून दिली जाते, असे खालिद म्हणाले. अभिनंदन यांचे प्रमोशन, झाले ग्रुप कॅप्टन विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आता ग्रुप कॅप्टन झाले आहेत. ग्रुप कॅप्टनचा दर्जा हा भारतीय सैन्यात कर्नलच्या बरोबरीचा असतो. अभिनंदन यांनी पाकिस्तानी लढाऊ विमान पाडले तेव्हा ते ५१ स्क्वॉड्रनचा भाग होते. त्यांची नियुक्ती श्रीनगरजवळील अविंतपुरा हवाई तळावर होती. ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांचे वडील सुद्धा हवाई दलात अधिकारी होते. आता ते निवृत्त झाले आहेत.