नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेतील ओमीक्रॉन (कोरोनाचा नवा विषाणू) याचा धोका वाढत असतानाही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत आशावादी आहे. मात्र, त्याचवेळी खेळाडूंच्या सुरक्षेस प्राधान्य असेल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. वाचा- बीसीसीआय आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्ड पदाधिकाऱ्यांची सातत्याने चर्चा सुरू आहे. मालिका होण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याचवेळी दोन्ही देशांच्या बोर्डसाठी खेळाडूंचे आरोग्य महत्त्वाचे आहे. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. आम्ही योग्य वेळी याबाबत अंतिम निर्णय घेणार आहोत, असे बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेतील मालिका प्रेक्षकांसह होणार की प्रेक्षकांविना हा मुद्दा महत्त्वाचा नाही. अर्थात सर्व निर्णय घेताना आमच्यासाठी खेळाडूंचे आरोग्य सर्वांत महत्त्वाचे असेल. आमचे महत्त्व मालिका घेण्यास आहे, असेही ते म्हणाले. भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा १७ डिसेंबरला सुरू होईल. त्यात तीन कसोटी, तीन वन-डे आणि चार टी-२० लढतींचा समावेश आहे. वाचा- जोहान्सबर्ग, प्रिटोरिया धोकादायक जोहान्सबर्ग: ओमीक्रॉनचा दक्षिण आफ्रिकेत वेगाने प्रसार होत असून, त्याची मोठ्या प्रमाणावर लागण सध्या देशाच्या उत्तर विभागात जास्त होत आहे. या परिस्थितीत जोहान्सबर्ग आणि प्रिटोरिया येथे खेळण्याचा धोका असेल असे मानले जात आहे. त्यामुळे दौऱ्याबाबत जास्त अनिश्चितता आहे. या नव्या कोरोनामुळे आफ्रिकेतून येणाऱ्यांवरील निर्बंध वाढत आहेत. त्याचबरोबर देशातील निर्बंध वाढत आहेत. त्यामुळे भारताविरुद्धच्या मालिकेबाबत दोन दिवसानंतरच निर्णय होईल, असे क्रिकेट आफ्रिकेने सांगितले आहे. दक्षिण आफ्रिकेतील नवोदित क्रिकेटपटूंसाठी भारतीय संघाच्या दौऱ्याची नितांत गरज आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेतील माजी फलंदाज फरहान बेहार्दिएन यांनी व्यक्त केले. वाचा- असा आहे भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, जोहान्सबर्ग दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, सेंच्युरियन तिसरी कसोटी- ३ ते ७ जानेवारी, केपटाउन -- पहिली वनडे-११ जानेवारी, पार्ल दुसरी वनडे- १४ जानेवारी, केपटाउन तिसरी वनडे- १६ जानेवारी, केपटाउन -- पहिली टी-२०- १९ जानेवारी, केपटाउन दुसरी टी-२०- २१ जानेवारी, केपटाउन तिसरी टी-२०- २३ जानेवारी, पार्ल चौथी टी-२०- २६ जानेवारी, पार्ल