
नवी दिल्लीः प्रभू श्रीरामावर श्रद्धा असलेल्या भाविकांसाठी भारतीय रेल्वेने रामायण यात्रा ट्रेन चालवली आहे. IRCTC ने धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी 'देखो अपना देश' या उपक्रमांतर्गत ही डीलक्स एसी टुरिस्ट ट्रेन सुरू केली आहे. पण ही ट्रेन सर्विस स्टाफच्या ड्रेस कोडवरून वादात आली. रामायण एक्स्प्रेसमधील सेवा कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड भगवा होता. यावरून काही संतांनी सोमवारी रेल्वेला इशारा दिला होता. ट्रेनमधील सेवेतील कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड बदला, अन्यथा १२ डिसेंबरला दिल्लीत रोखू. सेवेतील कर्मचाऱ्यांचा भगवा ड्रेस कोड हा हिंदू धर्माचा अपमान आहे, असे ते म्हणाले. संतांनी आक्षेप घेतल्यानंतर रेल्वेकडून तत्काळ कारवाई करण्यात आली आणि रामायण एक्स्प्रेसमधील सेवा कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड पूर्णपणे बदलण्यात आला. 'श्री रामायण यात्रा एक्स्प्रेसच्या सेवा कर्मचाऱ्यांचा ड्रेस पूर्णपणे बदलण्यात आला आहे. आता सेवा कर्मचारी व्यावसायिक कपड्यात दिसणार आहेत. गैरसोयीबद्दल क्षमस्व', असे म्हणत रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली आहे. रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून आम्ही रामायण एक्स्प्रेसच्या सेवा कर्मचार्यांच्या ड्रेस कोडबाबत नाराजी व्यक्त केली होती. आम्ही दोन दिवसांपूर्वी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून रामायण एक्स्प्रेसमध्ये भगव्या रंगात जेवण देणाऱ्या वेटर्सचा निषेध नोंदवला आहे. भगव्या पोषाखात साधूंसारखी टोपी घालणे आणि रुद्राक्ष माळ (हार) घालणे हा हिंदू धर्माचा आणि संतांचा अपमान आहे. मागण्या मान्य न झाल्यास साधू रेल्वे रुळावर बसून दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावर ट्रेन रोखतील. हिंदू धर्माचे रक्षण करणे आवश्यक आहे, असा इशारा उज्जैन आखाडा परिषदेचे माजी सरचिटणीस अवधेशपुरी यांनी दिला होता. ही ट्रेन ७ नोव्हेंबर दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून रवाना झाली आणि प्रभू श्रीरामाशी संबंधित सर्व ठिकाणी फिरेल. 'देखो अपना देश' अंतर्गत या विशेष ट्रेनच्या प्रवास अयोध्या, सीतामढी, काशी, प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूट, नाशिक आणि नंतर प्राचीन किष्किंदा शहर हंपी येथील मंदिराना भेट देत पुढे जाईल.