
मुंबई : जागतिक बाजारात घसरला आहे, मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी तूर्त पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केलेला नाही. आज देशभरात सलग नवव्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत. आज शनिवारी चार प्रमुख महानगरातील पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झाला नाही. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल १०३.९७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. मुंबईत एक लीटर ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपये इतके आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये आहे. केंद्र सरकारने दिवाळीत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ५ रुपये आणि १० रुपयांची कपात केली होती. त्यांनतर जवळपास २३ राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. त्यामुळे तेथे पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त झाले आहे. तत्पूर्वी कंपन्यांनी केलेल्या दरवाढीने पेट्रोल आणि डिझेल दर उच्चांकी पातळीवर गेले होते. २७ दिवस झालेल्या सलग दरवाढीने पेट्रोल ८.१५ रुपयांनी महागले होते. ३० दिवस झालेल्या दरवाढीने डिझेलचा भाव ९.४५ रुपयांनी वाढला होता. दरम्यान मागील काही दिवस तेजीत असलेल्या कच्च्या तेलाचा भावात मात्र घसरण झाली आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात शुक्रवारी कच्च्या तेलाचा भाव ७० सेंटने कमी झाला. ब्रेंट क्रूडचा भाव शुक्रवारी ०.८ टक्क्यांनी कमी झाला आणि प्रती बॅरल ८२.१७ डॉलर इतका झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ८० सेंटने कमी झाला आणि तो ८०.७९ डॉलर प्रती बॅरल झाला. मागील काही आठवड्यांमध्ये जगभरात कच्च्या तेलाची मागणी वाढली आहे. अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टीटयुटनुसार गेल्या आठवड्यात अमेरिकेत कच्च्या तेलाचा साठा २.४८५ दशलक्ष बॅरल इतका होता.