: गाडी आणि फ्लॅट घेण्यासाठी सासरकडून मुलीचा होत असलेला छळ सहन न झाल्याने मुलीच्या वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापूर इथं घडली होती. त्यानंतर वडिलांनी आपल्यामुळे जीव गमावल्याने दु:खी झालेल्या मुलीनंही प्राण सोडले आहेत. देगलूर तालुक्यातील सुगाव येथील माधुरी शंकर भोसले हिचा विवाह आठ महिन्यापूंर्वी मुखेड तालुक्यातील उंद्री येथील संदीप वडजे याच्याशी झाला होता. संदीप पुणे येथे कंपनीत नोकरी करत होता. लग्नानंतर पती संदीप आणि सासरच्या मंडळींनी गाडी आणि फ्लॅट घेण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी माधुरीकडे करत तिचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. माधुरीने ही बाब वडील शंकर भोसले यांना सांगितली. शंकर भोसले यांनी अगोदरच मुलीचं लग्न कर्ज काढून केलं आणि ते कर्ज फिटलं नाही तोच आता ५ लाख रुपये कुठून आणू म्हणून ते चिंतेत होते. याच चिंतेतून सोमवारी रात्री मुलीच्या सासरकडची मागणी पूर्ण करू शकत नाही म्हणून शंकर यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वडिलांनी आपल्यामुळे आत्महत्या केल्याचं दुखः माहेरी असलेल्या माधुरीला सहन झाले नाही आणि तिने वडिलांच्या मृतदेहाच्या शेजारीच प्राण सोडले. मयत शंकर भोसले यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन पती संदीप वडजेसह माधुरीच्या सासरच्या ५ जणांविरोधात देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.