
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने एसटी संपकरी संपकऱ्यांसह बडतर्फ कर्मचारऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी २२ एप्रिलपर्यंतची मुदत दिल्यानंतर अद्याप सहा हजार कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात महामंडळ आक्रमक झाले असून या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. सिल्व्हर ओकवर हल्ला करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतले जाणार नसल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. एसटी संपपूर्व काळात अर्थात ३० सप्टेंबर २०२१ रोजी महामंडळात १,२६,१३९ मंजूर कर्मचारी पदापैकी ९२,२६६ कर्मचारी उपस्थित होते. या सर्व कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला होता. २२ एप्रिल अखेर ८२,३६० कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. बडतर्फ कर्मचाऱ्यांची विभाग नियंत्रकांसमक्ष सुनावणी झाल्यावर त्यांना आगार प्रमुखाकडे हजेरी लावावी लागते. यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी होते. बराच काळ स्टिअरिंगपासून दूर राहिल्याने त्यांना 'रिफ्रेशमेंट ट्रेनिंग' दिले जाते. त्यानंतर त्यांना सेवेत रुजू केले जाते. एसटी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत अपील सुनावणी सुरू असते. यामुळे १० मेपर्यंत तंतोतंत हजर कर्मचारी आणि कारवाई झालेले कर्मचारी यांची माहिती उपलब्ध होईल, असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. बडतर्फ कर्मचाऱ्यांनी तीन आठवड्यांच्या आत अपील करून त्यावर चार आठवड्यांत महामंडळाने निर्णय घ्यावा, अशा सूचना उच्च न्यायालयाने केल्या आहेत. त्यानुसार ११ हजार बडतर्फ कर्मचाऱ्यांपैकी ९,५७७ कर्मचाऱ्यांनी अपील दाखल केले. यापैकी ४,७०१ कर्मचाऱ्यांचे अपील निकालात काढण्यात आले असून त्यांना कामावर घेण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचे अपील निकालात काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अपील न केलेल्या आणि शरद पवार यांच्या घरावर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार नाही, असे महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राजन शेलार यांनी सांगितले. पालघर विभागात ९९.९८ टक्के कर्मचारी रुजू महामंडळाच्या पालघर विभागामधील आठही आगारांत पाच महिन्यांच्या संपानंतर ९९.९८ टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत शुक्रवारपासून शिवशाही, एशियाड यासह सर्वत्र लालपरी सुसाट धावू लागली आहे.