
tushar.bodkhe@timesgroup.com @tusharbMT उदगीर : 'आजकाल ठराविक विचारधारेला पोषक साहित्याची निर्मिती ( akhil bharatiya ) करण्यावर काही घटक भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. प्रचारसाहित्य निर्मिती ही निरंकुशतेला निमंत्रण देते आणि अराजकता ओढवते. आपल्या देशातही अशा विशिष्ट विचारधारेचा फसवा प्रचार फैलावताना दिसतो आहे. त्यामुळे साहित्यिक आणि साहित्य रसिकांनी डोळ्यांत तेल घालून जागे रहावे', असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार ( ) यांनी ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांनी केले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी देशाची सद्य:स्थिती आणि साहित्यप्रवाहांवर भाष्य केले. 'साहित्यिकांनी कोणत्याही विचारधारेला बांधील नसावे. कारण अशा बांधिलकीतून मतप्रणाली तयार होते. ती बुद्धिभेद करणारी, ध्रुवीकरण करणारी, विषारी स्वरूपाची आणि राष्ट्रहिताला बाधा आणणारी असू शकते. समान अंतरावर राहून त्याकडे त्रयस्थाप्रमाणे पाहावयास हवे. राज्यकर्ते मतप्रचार थेट करीत नाहीत. त्यांनी साहित्य अथवा माध्यमाची कमकुवत अंगे न्याहाळली आहेत. प्रसारमाध्यमांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत हुशारीने कॉर्पोरेट जगाची मदत घेऊन मतप्रचार राबवणे सुरू केले आहे. चित्रपट क्षेत्रात त्याचा उघड उघड झालेला शिरकाव आपणास दिसतो आहे. हे कॉर्पोरेटीकरण साहित्यात झाले, तोट्यात असलेल्या प्रकाशन संस्था त्यांनी ताब्यात घेतल्या, की चौथा स्तंभ समूळ कोसळण्यास वेळ लागणार नाही. या धोक्याच्या घंटेकडे आग्रहाने आपले लक्ष वेधू इच्छितो', असे पवार म्हणाले. कवितांची पुस्तके आज कमी होत चालली आहेत. काव्यसंग्रह प्रकाशनाच्या अर्थकारणाचे गणित जुळत नसल्याने हे घडत असावे. मात्र, एकूणच ग्रंथ प्रकाशनाची बाजू फारशी उत्साहवर्धक नाही. हे चित्र बदलणे गरजेचे असल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान, साहित्य संमेलनात महिलांची दहा टक्केही उपस्थिती नाही याकडे पवार यांनी लक्ष वेधले. विशेषत: संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड निवडणूक पद्धतीने सुरू झाल्यानंतर साहित्यिकांच्या अंतरंगात आमच्यातील राजकारणी घुसू लागला आहे. त्याचा सर्वाधिक तोटा महिला साहित्यिकांना संभवतो. महामंडळाच्या घटनेत सुधारणा करून संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षांतून किमान एकदा महिलाध्यक्षा नियुक्त व्हावी अशी तरतूद असावी, असे पवार यांनी महामंडळाचे अध्यक्ष ठाले-पाटील यांना सांगितले. 'ऐकीव माहितीवर लिहिणे प्रमाद' साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वानवा आज जाणवते. संशोधनात्मक लिहिले जात असेल, परंतु ते वाचकांपर्यंत पोहोचत नसावे. विशेषत: ऐतिहासिक लिखाणात सखोल संशोधन व अभ्यास आवश्यक असतो. इतिहासकाराने सबळ पुराव्याधारे न लिहिता ऐकीव व तार्किक माहितीच्या आधारे लिहिणे हा मोठा प्रमाद आहे. तो अनेक दीर्घकालीन वादविवादांना जन्म देतो. असे लेखन वेळीच रोखले पाहिजे; नाही तर जनमानसांत त्या चुका मूळ धरू लागतात आणि ठाण मांडून बसतात. कयास आणि कल्पनाविलास करण्यासाठी इतर फिक्शनल साहित्य प्रकार आहेत, असे पवार म्हणाले. 'समाजाच्या भवितव्याची सूत्रे छद्मबुद्धी विद्ध्वंसकांच्या ताब्यात' 'संविधानाला अभिप्रेत असलेला भारत घडवला जातो आहे किंवा नाही याबाबत मराठी साहित्य बोलताना आढळत नाही. आता तर संविधानच बदलण्याची भाषा सुरू आहे. बालबुद्धी विद्ध्वंसकांच्या हातामध्ये समाजाच्या भवितव्याची सूत्रे नकळतपणे जात असून, आपण अशा छद्मबुद्धी विद्ध्वंसकांच्या ताब्यामध्ये जातो आहे, असे संकेत मिळायला लागले आहेत. हे विद्ध्वंसक पुढील पिढीच्या हातामध्ये कोणता भिकेचा कटोरा देणार आहेत याचा अंदाज थाळीनादातून आला आहे', अशी घणाघाती टीका ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी अध्यक्षीय भाषणातून केली.