
डहाणू : अमरावतीच्या खासदार आणि त्यांचे पती आमदार () यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याविरुद्ध खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याचा आरोप पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील शिवसैनिकांनी केला आहे. तसंच शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी तलासरी पोलीस ठाण्यात शिवसेनेचे तालुका संघटक विजय माळी यांच्यामार्फत राणा दाम्पत्याविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तलासरी हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला आहे. मात्र, पालघरचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांचे निवासस्थान तलासरी येथे आहे. शनिवारी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास आमदार श्रीनिवास वनगा यांनी मोजक्या शिवसैनिकांसह तलासरी पोलीस ठाणे गाठून तक्रार अर्ज दाखल केला. पालघरच्या पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने हा तक्रार अर्ज खार पोलीस ठाण्यात पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरणे संतापजनक असल्याचं सांगत आमदार श्रीनिवास वनगा यांनी राणा दाम्पत्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.