नाराजी नाट्यानंतर प्रशिक्षकांना प्रवेश, लव्हलिनाच्या गुरू संध्या राष्ट्रकुल क्रीडाग्राममध्ये दाखल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 27, 2022

नाराजी नाट्यानंतर प्रशिक्षकांना प्रवेश, लव्हलिनाच्या गुरू संध्या राष्ट्रकुल क्रीडाग्राममध्ये दाखल

https://ift.tt/RCGpT8k
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमधील भारताची ब्राँझ पदकविजेती बॉक्सर लव्हलिना बर्गोहायच्या प्रशिक्षक संध्या गुरुंग यांना अखेर गुरुवारी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे ‘अॅक्रिडिशन’ मिळाले अन् त्यांचा क्रीडाग्राममध्ये प्रवेश झाला. त्यांना प्रवेश नाकारल्यामुळे लव्हलिनाने सोशल मीडियावर पोस्ट टाकत कठोर शब्दांत नाराज व्यक्त केली होती. सतत प्रशिक्षक बदलून आपली मानसिक छळवणूक केली जात असल्याचा आरोपही तिने केला होता. या सगळ्याचा परिणाम तिच्या राष्ट्रकुल कामगिरीवरही होईल, असे तिचे म्हणणे होते. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननेही प्रशिक्षकांना प्रवेश दिल्याच्या वृत्तास दुजोरा दिला असून संध्या यांना गुरुवारी राष्ट्रकुलचे ‘अॅक्रिडिशन’ही मिळाल्याचे माध्यमांना सांगितले. आयर्लंड येथील १५ दिवसांचे सरावशिबीर आटोपल्यानंतर भारतीय बॉक्सिंग संघ गेल्या रविवारी रात्री राष्ट्रकुलच्या क्रीडाग्राममध्ये दाखल झाला. त्यावेळी ‘अॅक्रिडिशन’ नसल्याने लव्हलिनाच्या खासगी प्रशिक्षक संध्या यांना क्रीडाग्राममध्ये प्रवेश नाकारला होता. -अन् हालचालींना वेग आला...लव्हलिनाने लगेचच ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केल्याने क्रीडा मंत्रालय आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए) यांनी दखल घेत प्रशिक्षक संध्या यांना ‘अॅक्रिडिशन’ मिळवून दिले. ‘संध्या यांना मंगळवारी सकाळी क्रीडाग्राममध्ये प्रवेश देण्यात आला. ‘अॅक्रिडिशन’ सह, क्रीडाग्राममध्ये त्यांच्या राहण्याची सोयही करण्यात आली आहे’, असे आयओएच्या अधिकाऱ्याने सांगितले. -संध्या यांची भूमिकालव्हलिनाच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या कामगिरीत प्रशिक्षक संध्या यांच्या मार्गदर्शनासह भावनिक आधाराचाही महत्त्वाचा वाटा आहे. मानसिकदृष्ट्या खचलेल्या लव्हलिनाला संध्या यांनी सावरले. तिचे बौद्धिक घेत तिला वरिष्ठांप्रमाणे मानसिक आधारही दिला. याचा फायदा लव्हलिनाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये झाला. अशा प्रशिक्षकांना महत्त्वाच्या स्पर्धांदरम्यान दूर ठेवले जात असल्याने लव्हलिनाने नाराजी व्यक्त केली. -नियम असा की...भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने (बीएफआय) यावेळी राष्ट्रकुल क्रीडाग्रामच्या नियमांकडे बोट दाखवले. या नियमांनुसार संघाच्या तुलनेत सपोर्ट स्टाफची संख्या एक त्रृतीयांश असवी. भारतीय बॉक्सिंग संघात १२ खेळाडू आहेत (आठ पुरुष बॉक्सर, चार महिला बॉक्सर). त्यानुसार प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची सख्या चार असणे बंधनकारक आहे, असा नियम आहे. ‘बॉक्सिंगमध्ये एकामागोमाग एक लढतींचे आयोजन होत असते. त्यामुळे प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ पुरेसे असतील तर खेळाडूंना सोयीचे जाते. आयओएने मध्यस्थी करत १२ बॉक्सरचा सहभाग असलेल्या संघांसाठी सपोर्ट स्टाफची संख्या चारवरुन आठ केली’, अशी माहिती बीएआयतर्फे देण्यात आली.