आजपासून महागाईत भर! सामान्यांचे घरखर्चाचे गणित बिघडणार, 'या' वस्तू महागणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 18, 2022

आजपासून महागाईत भर! सामान्यांचे घरखर्चाचे गणित बिघडणार, 'या' वस्तू महागणार

https://ift.tt/fateC6X
वृत्तसंस्था, नवी दिल्लीः बिगर ब्रँडेड पण लेबल लावून विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांवर बहुचर्चित पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आज, सोमवारपासून लागू होणार असल्यामुळे देशात महागाईमध्ये भर पडणे अपरिहार्य आहे. कणिक, पनीर, दही यांसारख्या सुट्या व बिगर ब्रँडेड वस्तू विकताना त्यावर पाच टक्के जीएसटी वसूल करण्यात येणार आहे. त्याच वेळी ५,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रुग्णालय खोल्यांसाठी जीएसटी आकारण्यात येणार असल्याने वैद्यकीय सेवाही महागणार आहेत. जीएसटी परिषदेत निर्णय जीएसटीचे करस्तर ठरवणाऱ्या जीएसटी परिषदेची मागील महिन्यात बैठक झाली होती. या बैठकीत जीएसटीतून वगळण्यात आलेल्या; तसेच जीएसटी सवलत मिळणाऱ्या अनेक वस्तूंना जीएसटी कक्षेअंतर्गत आणण्याचा निर्णय झाला. त्याच वेळी अनेक वस्तू व सेवांवर जीएसटी वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला. या बैठकीत याविषयीचे प्रस्ताव मंजूर झाले. अशी होईल जीएसटी वाढ - सध्या १२ टक्के जीएसटी लागू असणाऱ्या शाई (प्रिटिंग, लेखन व चित्रकला यासाठी वापरली जाणारी), कटिंग ब्लेडसह मिळणारे चाकू, कागद कापण्याचे चाकू, पेन्सिल शार्पनर, एलईडी दिवे, चित्रकलेसाठी लागणारे साहित्य या सर्व वस्तूंवर आता १८ टक्के जीएसटी लागेल. - सोलर वॉटर हिटरवर सध्या पाच टक्के जीएसटी लागत होता. त्यावर आता १२ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. - रस्तेबांधणी, पूलबांधणी, रेल्वे, मेट्रो यासाठी दिले जाणारे कंत्राट, सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, स्मशानातील विधी व साहित्य यांवर आता १२ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी लागणार. - रिझर्व्ह बँक, विमा नियामक व विकास प्राधिकरण (आयआरडीए) आणि सेबी या नियामक संस्था देत असलेल्या सेवांवर १८ टक्के जीएसटी लागणार. - बायोमेडिकल कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या सुविधांवर आता १२ टक्के जीएसटी. - रुग्णालयातील बिगर-अतिदक्षता खोल्यांचे एका दिवसाचे भाडे पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असेल, तर त्यावर पाच टक्के जीएसटी लागणार. अशी होईल जीएसटी घट - ऑस्टोमी प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या उपकरणांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात येणार आहे. - ट्रक, मालवाहू वाहने (ज्याच्या भाड्यामध्ये इंधनाची किंमतही अंतर्भूत असते) भाड्याने घेतल्यास त्या भाड्यावर १८ टक्क्यांऐवजी आता १२ टक्के जीएसटी लागेल. - विमानाने इकॉनॉमी क्लासमधून ईशान्येकडील राज्ये आणि बागडोगरा येथे प्रवास करताना त्या प्रवासाच्या भाड्यावर जीएसटी माफ करण्यात आला आहे. - बॅटरीसोबत असलेल्या विजेवर चालणाऱ्या वाहनांवर पाच टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. बिगर ब्रँडेड अन्नधान्य, खाद्यपदार्थ यांवरील पाच टक्के जीएसटी हा सर्वसामान्यांशी निगडित विषय असून, समान्यांचे बजेट यामुळे कोलमडणार आहे. सरकारला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी सातत्याने देशभर आंदोलने छेडण्यात येतील. - ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स