राष्ट्रपतिपदासाठी आज मतदान; एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 18, 2022

राष्ट्रपतिपदासाठी आज मतदान; एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड

https://ift.tt/zsjE40H
- मतदानास पात्र खासदार, आमदार : सुमारे ४,८०० - एकूण मते : १० लाख ८६ हजार ४३१ - मुर्मू यांना मिळणारी संभाव्य मते : ६ लाख ६७ हजार वृत्तसंस्था, नवी दिल्ली: देशाचे १५वे राष्ट्रपती निवडण्यासाठी सुमारे ४,८०० खासदार आणि आमदार आज, सोमवारी मतदान करणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) यांना, तर विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना संयुक्त उमेदवारी दिली आहे. मात्र मुर्मू यांचे पारडे जड असून त्यांना ६० टक्क्यांहून अधिक मते मिळण्याची शक्यता आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै २०२२ रोजी संपणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ९ जून रोजी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, आज, सोमवारी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. संसद भवन आणि राज्य विधिमंडळांच्या इमारतींमध्ये हे मतदान होईल. ज्यासाठी मतपेट्या आधीच त्या-त्या ठिकाणी पोहोचल्या आहेत. २१ जुलै रोजी संसद भवनमध्ये मतमोजणी होणार असून नवे राष्ट्रपती २५ जुलै रोजी शपथ ग्रहण करतील. बिजू जनता दल (बीजेडी), वायएसआर काँग्रेस, बहुजन समाज पक्ष (बसप), अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (अण्णाद्रमुक), जनता दल (धर्मनिरपेक्ष), तेलगू देसम पार्टी (टीडीपी), शिरोमणी अकाली दल, शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा सारख्या प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्यामुळे 'रालोआ'च्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार मुर्मू यांच्या मतांची टक्केवारी जवळपास दोनतृतीयांशपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे हे सर्वोच्च घटनात्मक पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरू शकतात. दरम्यान, आसाममधील 'ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट'ने (एआययूडीएफ) रविवारी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला. मुर्मू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हाच्या परिस्थितीवरून त्यांना सुमारे ५० टक्के मते मिळतील, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता विविध प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्यामुळे मुर्मू यांना एकूण १० लाख ८६ हजार ४३१ मतांपैकी तब्बल ६ लाख ६७ हजार मते मिळण्याची शक्यता आहे. देशभरातून निवडून आलेले खासदार आणि राज्य विधानमंडळांचे सदस्य (आमदार) समानुपातिक प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकतात. या निवडणुकीत नामनिर्देशित खासदार, आमदार आणि विधान परिषदेच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात नसल्याने खासदारांच्या मताचे मूल्य ७०८वरून ७००वर आले आहे. उत्तर प्रदेशच्या आमदारांचे मतमूल्य सर्वाधिक लखनऊ : उत्तर प्रदेशात निवडून आलेल्या आमदारांची संख्या ४०३ आहे. प्रत्येक आमदाराचे मतमूल्य अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे २०८ असल्याने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत हे राज्य महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यापाठोपाठ तमिळनाडू आणि झारखंडच्या प्रत्येक आमदाराच्या मताचे मूल्य १७६, तर महाराष्ट्रातील मतमूल्य १७५ आहे.