
नवी दिल्ली : अमेरिकेच्या संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी या तैवानच्या तैपई विमानतळावर उतरल्या आहेत. पेलोसींच्या दौऱ्यामुळं चीन आणि अमेरिकेतील तणाव वाढला होता. पेलोसी चीनचा दबाव झुगारत तैपई विमानतळावर दाखल झाल्या आहेत. जग सध्या रशिया आणि यूक्रेनच्या युद्धामुळं होरपळत आहे. भारताच्या पूर्वेकडे असा संघर्ष सुरु झाल्यास त्याचे अत्यंत नकारात्मक परिणाम आशियाला भोगावे लागण्याची शक्यता आहे. चीनच्या दृष्टीनं तैवान महत्त्वाचा आहे. चीननं हाँगकाँग, तैवान आणि तिबेटच्या संरक्षणासाठी अणवस्त्राचा वापर केला जाईल, असा इशारा दिला आहे.चीननं तैवानवर आक्रमण केल्यास नवा संघर्ष सुरु होण्याची शक्यता आहे. नव्या संघर्षात अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया तर दुसरीकडे रशिया, चीन आणि इराण असण्याची शक्यता आहे. मात्र, चीनच्या अर्थव्यवस्थेवर करोनाचा परिणाम झाला नव्हता. त्यामुळं तैवानच्या मुद्यावरुन अमेरिका चीनची कोंडी करुन युद्धाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. तैवानची समुद्रधुनी व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचा भाग आहे. तैवानवर चीनचा कब्जा झाला तर चीनकडून व्यापारावर जकात लावला जाऊ शकतो. त्यामुळं अमेरिकेच्या मित्र देशांना फटका बसू शकतो. अमेरिका आपल्या सहकारी देशांसाठी चीनच्या विरोधात भूमिका घेत आहे. चीननं तैवानवर आक्रमण केल्यास भारतावर परिणाम होणार आहे. भारताचा ५० टक्के व्यापार आशिया प्रशांत क्षेत्रात होतो. त्यामध्ये दक्षिण चीन समुद्र महत्त्वाचा आहे. दक्षिण चीन समुद्र भारतासाठी सामरिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. रशिया आणि यूक्रेन युद्धावेळी भारताच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. दक्षिण पूर्व आशियाशी भारताच्या व्यापारवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आगामी काळात चीन अमेरिका संघर्ष निर्माण झाल्यास भारत चीनच्या विरोधात भूमिका घेण्याची शक्यता कमी आहे. भारत या संघर्षात चीन विरोधात भूमिका घेणार नाही, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, चीननं अमेरिकेवर विश्वासघाताचा आरोप केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीनं नॅन्सी पेलोसी यांच्या दौऱ्याचा निषेध करण्यात आला आहे. चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हद्दीत प्रवेश केल्याची माहिती देखील समोर आली आहे.