
शारजा : श्रीलंकेच्या संघाने आशिया चषक स्पर्धेच्या फायनलच्या दिशेने ठोस पाऊल टाकले आहे. श्रीलंकेच्या संघाने अफगाणिस्तानच्या पराभवाचा बदला आज व्जासकट घेतला. सुपर -४ फेरीत श्रीलंकेने अफगाणिस्तानवर चार विकेट्स राखून दमदार विजय साकारला आणि त्यांनी फायनलच्या दिशेने आता कूच केली आहे. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १७५ धावा केल्या होत्या. श्रीलंकेने हा आव्हान चार विकेट्स आणि पाच चेंडू राखत सहज पूर्ण केले. श्रीलंकेने टॉस जिंकल्यावर अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पण यावेळी अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाझने श्रीलंकेच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. त्याने सुरुवातीपासून श्रीलंकेच्या गोलंदाजीवर हल्ला चढवायला सुरुवात केली. त्यामुळे अफगाणिस्तानला यावेळी चांगली सुरुवात करता आली. गुरबाझने ४५ चेंडूंत ४ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ८४ धावांची तुफानी खेळी साकारली. गुरबाझला यावेळी इब्राहिम झारदानने ४० धावांची खेळी साकारत चांदली साथ दिली. गुरबाझच्या वादळी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करताना १७५ धावा करता आल्या. अफगाणिस्तानच्या १७६ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला ६२ धावांची दमदार सलामी मिळाली. श्रीलंकच्या कुशल मेंडिस आणि पथुम निसांका यांनी सुरुवातीपासून फटकेबाजीला सुरुवात केली. मेंडिसने गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते, पण यावेळी त्याला ३६ धावांवर समाधान मानावे लागले. पथुमने यावेळी ३५ धावा करत कुशलला चांगली साथ दिली. त्यानंतर श्रीलंकेचे तीन फलंदाज ठराविक फरकाने बाद झाले आणि त्यांचा संघ अडचणीत सापडणार, असे दिसत होते. पण त्यावेळी धनुशा गुणतिलका संघासाठी धावून आला, त्याने २० चेंंडूंत ३३ धावांची खेळी साकारली. गुणतिलका आता मोठी खेळी साकारणार, असे वाटत होते. पण रशिद खानने यावेळी त्याला बाद करत श्रीलंकेला मोठा धक्का दिला. त्यावेळी सामना दोलायमान अवस्थेत होता. पण त्यानंतर भानुका राजपक्षाने १४ चेंडूंत ३१ धावांची दमदार खेळी साकारली आणि संघाला विजयाची आशा दाखवली. पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. त्यामुळे पुन्हा एकदा हा सामना कोण जिंकणार, याची उत्सुकता वाढली होती. पण त्यांतर श्रीलंकेच्या वानिंडू हसरंगाने मोक्याच्या क्षणी ९ चेंडूंत तीन चौकारांच्या जोरावर नाबाद १६ धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. श्रीलंकेने आता सुपर-४ मधील पहिला सामना जिंकला आहे. या विजयासह त्यांनी फायनलच्या दिशेने कूच करायला सुरुवात केली आहे.