
मुंबई : जसप्रीत बुमराला आता दुखापत झाली आहे आणि त्यामुळे तो विश्वचषकात खेळू शकत नाही, असे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांतील हा भारताला बसलेला दुसरा धक्का आहे. यापूर्वी रवींद्र जडेजाच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला होता. त्यानंतर आता बुमराच्या रुपात दुसरा धक्का बसला. पण या सर्व गोष्टींमध्ये राहुल द्रविड यांचे नेमकं चुकतंय तरी काय, याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. रवींद्र जडेजाची दुखापत ही गंभीर स्वरुपाची आहे. त्याच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रीया करण्यात आली आणि आता तो कुबड्यांचा आधार घेऊन चालत असल्याचे पाहायला मिळाले. जडेजाला ही दुखापत क्रिकेटच्या मैदानात झाली नाही किंवा सराव करतानाही झाली नाही. जडेजाला ही दुखापत एक साहसी खेळ करताना झाली, ज्याचा भारताच्या सरावाशी काहीही संबंध नव्हता. आशिया चषकासारखी मोठी स्पर्धा सुरु होती आणि विश्वचषक काही दिवसांवर येऊन ठेपला असताना खेळाडू नेमकं काय करत आहेत आणि त्यांचा खेळाडूंच्या फिटनेसवर काही परीणाम होणार नाही ना, हे संघ व्यवस्थापनाने पाहायला हवे होते. कारण त्यापूर्वीही जडेजा संघाचा भाग नव्हता. त्यामुळे जडेजासारख्या खेळाडूला जपणे हे फार महत्वाचे होते. बुमरा हा बऱ्याच दिवसांनी मैदानात परतला होता. पण गेल्या काही दिवसांमध्ये बुमरा नेमकं किती क्रिकेट खेळला हे पाहणे त्यासाठी गरजेचे आहे. आयपीएलमध्ये बुमराला लौकाकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर बुमरा थेट इंग्लंडच्या दौऱ्यावर कसोटी सामना खेळण्यासाठी गेला. त्यानंतर तो एक ट्वेन्टी-२० आणि दोन वनडे सामने खेळला. त्यावेळीही बुमराला विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर बुमरा दुखापत झाल्याचे समोर आले आणि संपूर्ण आशिया चषकाला त्याला मुकावे लागले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात त्याला संधी दिली नाही. त्यानंतर दोन ट्वेन्टी-२० सामने तो खेळला. त्यानंतर पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो खेळू शकला नाही. आयपीएलनंतर बुमराला बरीच विश्रांती देण्यात आली, पण तरीही तो सातत्याने दुखापतग्रस्त असल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा विचार द्रविड आणि संघ व्यवस्थापनाने करायला हवा होता. कारण कोणताही खेळाडू खेळल्यावर तो फॉर्मात येऊ शकत नाही. त्यामुळे विश्वचषकापूर्वी त्याला खेळले ठेवायला हवे होते. पण गेल्या काही महिन्यांमध्ये त्याला बरीच विश्रांती देण्यात आली आणि त्यानंतर तो जायबंदी झाल्याचे पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला तरी जडेजा हा विश्वचषकाच्या संघाबाहेर आहे आणि बुमरादेखील त्या मार्गावर आहे. त्यामुळे द्रविड गुरुजी यांचं नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.