
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. मुंबईमध्ये मात्र मंगळवारीही मोठ्या प्रमाणात ढग दाटून आले तरी संध्याकाळपर्यंत केवळ शिडकावा होता. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य भारत तसेच वायव्य भारताच्या काही भागांमधून चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून माघार घेईल. महाराष्ट्रातील सध्याची गडगडाटासह पडणाऱ्या पावसाची परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्याही काही भागांमधून मान्सून माघार घेऊ शकतो अशी शक्यता आहे. बंगालचा उपसागर, मध्य प्रदेश येथे निर्माण झालेल्या प्रणालीमुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती. यातच मान्सूनचा परतीचा प्रवास असून प्रामुख्याने सध्या महाराष्ट्रात संध्याकाळनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडत असल्याने ही परतीच्या पावसाची चिन्हे असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातून परतीच्या पावसाच्या तारखा अजूनही जाहीर केलेल्या नसल्या तरी मध्य भारतातून परतीचा प्रवास येत्या चार ते पाच दिवसांमध्ये होणार असल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे या कालावधीत महाराष्ट्रातूनही परतीचा प्रवासाला सुरुवात होईल असे अनुमान आहे. यामध्ये शुक्रवारनंतर मुंबई आणि परिसरातही कोरडे वातावरण असल्याने मुंबईचाही समावेश होऊ शकेल. मात्र विदर्भात तसेच, मराठवाड्याचे काही जिल्हे आणि मध्य महाराष्ट्राचे काही जिल्हे मात्र शनिवारपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा अनुभव घेतील. तसेच दक्षिण कोकणामध्येही शुक्रवार आणि शनिवारपर्यंत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रातून माघार घ्यायला आणखी काही दिवस लागू शकतील. …दिवसभरात पाऊस नाही मुंबईमध्ये मंगळवारी दुपारनंतर मोठ्या प्रमाणात दाटून आले होते. मात्र संध्याकाळपर्यंत पाऊस नव्हता. कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही ठिकाणी संध्याकाळी ५.३०च्या नोंदीनुसार पाऊस पडला नाही. मंगळवारी सांताक्रूझमध्ये ३२ तर कुलाब्यामध्ये ३०.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. वाढलेल्या आर्द्रतेमुळे आणि तापमानातील किंचित वाढीमुळे उकाड्याचे प्रमाणही अधिक जाणवत होते. दिवसभर असलेले ढगांचे आच्छादन पाहता मुंबईत मुसळधार पाऊस कोसळेल अशी भीती वर्तवली जात होती. मात्र संध्याकाळनंतर तुरळक ठिकाणी पावसाचा केवळ शिडकावा झाला. दिवसभरात कल्याण-डोंबिवलीमध्ये तसेच नवी मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या.