...तर मिंधे सरकारच्या खुर्चीखाली धमाका झाल्याशिवाय राहणार नाही; 'सामना'तून जळजळीत टीका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 24, 2022

...तर मिंधे सरकारच्या खुर्चीखाली धमाका झाल्याशिवाय राहणार नाही; 'सामना'तून जळजळीत टीका

https://ift.tt/aByPGiV
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत ढासळणारा रुपया, अर्थव्यवस्थेची अधोगती आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरुन दैनिक 'सामना'तील अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. केंद्रातील सत्ताधारी आणि राज्यातील मिंधे सरकार आश्वासनांची जोरदार आतषबाजी करत आहे. पण जनतेच्या जीवनातील अंधार कायम आहे. 'अच्छे दिन'ची दिवाळी कुठे हरवली? अर्थव्यवस्थेचे दिवाळे का वाजले? डॉलरच्या धुमधडाक्यात रुपयाचा रोज 'आपटी बार' का होतोय? महागाई कमी का होत नाही? गॅस-पेट्रोलचे दर दुपटीने का वाढले? बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस का वाढतेय असे एक ना अनेक प्रश्न जनतेच्या मनात धुमसत आहेत. या फटाक्यांची वात पेटेल तेव्हा सरकारच्या खुर्चीखाली धमाका झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा 'सामना'तून देण्यात आला आहे. यंदाची दिवाळी नेहमीप्रमाणे हर्षोल्हासात साजरी होत असली तरी या आनंदोत्सवाला चिंतेची एक किनार आहे. राज्यातील महानगरे आणि मोठ्या शहरांमध्ये दिवाळीचा धुमधडाका जोरात दिसत असला तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ग्रामीण जनता चिंताक्रांत होऊन बसलेली दिसत आहे. दिवाळी म्हणजे मराठी जनतेचा आणि हिंदू धर्मीयांचा चैतन्यदायी सण. अंधकार दूर करणारा आणि प्रकाशकिरणांनी आसमंत उजळून टाकणारा. परिस्थिती कशीही असो प्रत्येक कुटुंबाला दिवाळीची ओढ असतेच. त्यामुळे ऋण काढून का होईना, दिवाळीचा पारंपरिक थाटमाट सांभाळण्याचा प्रयत्न जो तो आपापल्यापरीने करत असतोच. दिवाळी जवळ आली म्हटले की, सगळ्या बाजारपेठा नवनवीन वस्तूंनी नटूनथटून ग्राहकांच्या प्रतीक्षेत सज्ज असतात व दिवाळी संपेपर्यंत बाजारपेठांचे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेलेले असतात. यंदाही मुंबई-पुण्यापासून राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हेच चित्र आहे. दर महिन्याला ठराविक पगार मिळणाऱ्या चाकरमनी वर्गाला बोनस आणि निश्चित उत्पन्नामुळे कर्ज देण्यास तत्पर असलेल्या बँका यामुळे दिवाळीच्या खरेदीचा माहौल दिसत असला तरी बोनस, पगार मिळत नसलेल्या , शेतमजूर, गोरगरीब, कष्टकरी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मंडळींच्या नशिबी तेवढी चंगळ नसते. नोकरदार वर्ग उत्पन्नातून चार पैसे वाचवून मुलाबाळांसाठी फटाक्यांची खरेदी, थोडेफार गोडधोड करुन दिवाळीचे स्वागत करण्याचा प्रयत्न करत असतो. याचा अर्थ लोकांना दैनंदिन जीवनातील समस्यांचा विसर पडला आहे, अशा भ्रमात सरकारने राहू नये, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.

सत्तांतरामुळे मिंधे सरकारचे खिसे गरम झाले पण शेतकऱ्यांचं काय?

यंदाच्या पावसाळ्याने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना पुरते उद्ध्वस्त केले. लाखो हेक्टरवरील पिकाची नासाडी झाली. मूग, उडदापासून आता हातातोंडाशी आलेले सोयाबीन व कापसाचे पीकही ढगफुटीसारख्या पावसाने शेतातच सडत पडले. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. सत्तांतरातून राज्यात कोणाचे खिसे किती गरम झाले, हे आता महाराष्ट्रातील जनतेपासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची दिवाळी जोरात झाली असली तरी जनतेचे काय?, असा रोखठोक सवाल 'सामना'तून विचारण्यात आला आहे.