
मुंबई : शिवसेनेचे हे गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार चर्चेत आले आहेत. एकतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यावर मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली होती आणि जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यानंतर आता ठाकरे कुटुंबियांशिवाय मिलिंद नार्वेकर यांचे काही अडत नाही, हेच समोर आले आहे. मिलिंद नार्वेकर हे शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या गटामधून निवडणूकीसाठी उभे होते. या गटाला एकनाथ शिंदे आणि त्यांचा गटाचा चांगला पाठिंबा होता. त्यावेळीच सर्वांना मोठा धक्का बसला होता. शिवसेनेचे सचिव असलेले मिलिंद नार्वेकर या गटात आले तरी कसे, हे त्यावेळी कोणालाच कळत नव्हते. आज मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक झाली. मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीसाठी सर्व पक्षीय नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे तिघेही मुंबई क्रिकेट संघटनेचे सदस्य आहेत. पण या तिघांपैकी एकानेही आज झालेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीला उपस्थिती लावली नसल्याचे पाहायला मिळाले. एमसीएचा अध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता सर्वांना होती. पण त्याचबरोबर या निवडणूकीत मिलिंद नार्वेकर यांचे काय होते, याची उत्सुकता ताणली गेली होती. पण जरी ठाकरे कुटुंबियांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीला दांडी मारली असली तरी मिलिंद नार्वेकर विजयी ठरले. त्यानंतर मुंबई क्रिकेट संघटनेच्या वर्तुळात ठाकरेंशिवाय मिलिंद नार्वेकर यांचे काही अडत नाही. शिंदे आणि फडणवीस यांच्या पॉवर गेममुळेच त्यांचा विजय झाला, अशीच चर्चा जोरदार सुरु होती. ही निवडणूक राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठेचा विषय बनवला होता. कारण तब्बल तीनवेळा मुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित राहिले होते. मिलिंद नार्वेकर हे निवडणूकीसाठी उपस्थित होते, त्यामुळे त्यांना मतदान करायला हे तिघेही येतील, असे वाटत होते. पण यावेळी तिघांपैकी एकही ठाकरे एमसीएच्या निवडणूकीसाठी वानखेडे स्टेडियमच्या परीसरात फिरकलेच नाहीत. त्यामुळे मुंबई क्रिकेट संघटनेच्या वर्तुळात मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी ठाकरे कुटुंबिय का आले नाहीत, याचीच चर्चा सर्वात जास्त रंगलेली पाहायला मिळाली. काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला धक्का दिला होता. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासह शिवसेनेचे आमदार फोडत भाजपशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात आले आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या काळात मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर बऱ्याच चर्चांना उधाण आले होते.