
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोश्यारी यांच्यावर टीकेचा भडिमार करत त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. तर, उपमुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 'महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर तीन वर्षे राहिल्यानंतरही कोश्यारी यांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, तर या पदावर राहण्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे', अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. 'महापुरुषांचा वारंवार अपमान करून राज्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या या प्रवृत्तीची हकालपट्टी करा', अशी थेट मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. 'कोश्यारी यांनी जनतेची माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ', असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिला. याचवेळी, शिवरायांचा अपमान भाजपला मान्य आहे का, असा बोचरा प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, 'छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याचा राज्यपालांचा उद्देश असेल, असे मला वाटत नाही', अशी प्रतिक्रिया भाजप नेते आ. प्रवीण दरेकर यांनी दिली. तर, 'राज्यपालांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत', असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.