
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ते फक्त गुजरातचं हित पाहतात, अशी टीका होते. तरीही नरेंद्र मोदी यांनी 'मी प्रथम गुजराती' ही भूमिका सोडलेली नाही. ते उद्योगपती गौतम अदानी यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले आणि त्यांना जगातील तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती बनवले. काँग्रेस पक्षाने मोदी आणि अदानींवर टीका केली. पण गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला याचा जराही फायदा झाला नाही, असे मत ठाकरे गटाचे खासदार यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील रोखठोक सदरात संजय राऊत यांनी गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण केले आहे. यामध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांच्यामुळे गुजरातमध्ये भाजपला हरवणे कठीण आहे. पण याचा अर्थ इतर राज्यांमध्ये भाजप अजिंक्य आहे, असा होत नाही. हिमाचल प्रदेश आणि दिल्लीच्या निकालांनी ते दाखवून दिले आहे. सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या काँग्रेसला लोक अजूनही मरून देत नाहीत. ती या किंवा त्या राज्यात जिवंत होत असते. पंजाबची सत्ता गेली पण हिमाचल प्रदेशात काँग्रेस जिवंत झाली. भाजपच्या उद्याच्या राजकारणाचे चित्र या तीन निर्णयांनी स्पष्ट झाले आहे. भविष्यात भाजप फक्त उत्तर प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांवर भरवसा ठेऊ शकेल. पण विरोधक एकत्र झाले तर या दोन राज्यांचाही फार फरक पडणार नाही, असे भाकीत संजय राऊत यांनी वर्तविले आहे. देशात फक्त गुजरातमध्ये भाजपला मिळालेल्या विजयाची चर्चा सुरु आहे. पण हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाची चर्चाही होणे आवश्यक आहे. भाजपने दिल्ली महानगरपालिकेतील १५ वर्षांची सत्ता गमावली. हिमाचल प्रदेश हे राज्यही भाजपच्या हातातून गेले. तीन सामन्यांमध्ये भाजप फक्त एके ठिकाणी म्हणजे गुजरातमध्येच जिंकला. अन्य दोन ठिकाणी मोदी-शाह यांची जादू चालली नाही. यापूर्वी ती पंजाबमध्येही चालली नव्हती. पण भाजप फक्त विजयाचा उत्सव साजरा करतो. त्या उत्साहात लोक भाजपच्या पराभवाची चर्चा करायचे विसरतात, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.