
मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील प्रभादेवी परिसरात ठाकरे गट आणि शिंदे गटात झालेल्या राड्यावेळी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी आपल्या पिस्तुलमधून गोळी झाडल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी सदा सरवणकर यांना क्लिनचीट दिली आहे. त्यामुळे यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे. याप्रकरणात सदा सरवणकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी ठाकरे गट प्रचंड आक्रमक झाला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून पिस्तुल ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली होती. मध्यंतरीच्या काळात या पिस्तुलाची कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये प्रभादेवीत सदा सरवणकर यांच्या पिस्तुलमधून गोळी झाडण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. परिणामी सदा सरवणकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात होते. परंतु, आता मुंबई पोलिसांच्या अहवालात सदा सरवणकर यांना थेट क्लिनचीट देण्यात आली आहे. ठाकरे आणि शिंदे गटातील राड्यानंतर झाडण्यात आलेली गोळी सदा सरवणकर यांच्या पिस्तुलमधूनच बाहेर पडली होती. परंतु, त्यावेळी पिस्तुल सदा सरवणकर यांच्या हातात नव्हते, असा निष्कर्ष पोलिसांकडून काढण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच सदा सरवणकर हे निर्दोष ठरले आहेत. सध्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विक्रम काळे यांनी शुक्रवारी सभागृहात यासंदर्भात प्रश्न विचारला होता. तेव्हा लेखी उत्तरात देण्यात आलेल्या माहितीमध्ये सदा सरवणकर यांना पोलिसांनी क्लिनचीट दिल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले काडतूस सदा सरवणकर यांच्या पिस्तुलमधूनच सुटले होते. पण ती गोळी सदा सरवणकर यांनी झाडली नव्हती, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या सगळ्यावर आता ठाकरे गटाचे नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.