
नागपूर : नागपूरमध्ये चाकूने वार करून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही थरारक घटना रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वांजरा येथे घडली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी भावाला अटक केली आहे.मोहम्मद आरीफ अब्दुल हक अन्सारी (वय ४८ रा. डोबीनगर, मोमीनपुरा),असे मृतकाचे तर आबू दाऊद अब्दुल हक अन्सारी (वय ३१ रा. बिदर,कर्नाटक),असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे. आरीफ यांचे कपड्याचे दुकान आहे. आबूचाही बिदरमध्ये कापड विक्रीची व्यवसाय आहे. नागपुरात वास्तव्यास असताना आबूने आरीफच्या मदतीने वांजरा येथे १५०० चौरस फूट प्लॉट खरेदी केला. त्यानंतर आबू हा बिदरला गेला. आरीफ व त्याच्या अन्य भावाने या प्लॉटवर बांधकाम सुरू केले. याबाबत आबूला कळाले. त्याने मोबाइलद्वारे आरीफशी संपर्क साधला. भूखंड खरेदीसाठी मीही पैसे दिले आहेत. माझ्यासाठीही खोल्या बांध,असे आबू आरीफ यांना म्हणाला. ‘तुझे लग्न झाले नाही. तू बिदरला राहतो. तुला नागपुरात खोल्या कशासाठी हव्यात’,असे आरीफ त्याला म्हणाला. दोघांमध्ये सुरू झाला. रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास आबू हा नागपुरात आला. दुपारी ३ वाजता आबू हा वांजरा येथे गेला. यावेळी आरीफ , त्याची दोन मुले निर्माणाधीन बांधकाम स्थळावर होती. आबूने आरीफसोबत वाद घातला. वाद विकोपाला गेला. आबूने चाकूने आरीफच्या शरीरावर वार केले. घटनास्थळीच आरीफचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती माहिती मिळताच यशोधरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एम. भेदोडकर यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. यशोधरानगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.