'आरे'त विसर्जन निर्बंध, चार फुटांहून उंच गणेशमूर्ती चौपाट्यांवर न्याव्या लागणार; कृत्रिम तलाव कुठे? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 27, 2023

'आरे'त विसर्जन निर्बंध, चार फुटांहून उंच गणेशमूर्ती चौपाट्यांवर न्याव्या लागणार; कृत्रिम तलाव कुठे?

https://ift.tt/DJYTPci
मुंबई : मुंबई महापालिकेने आरे कॉलनीत दोन कृत्रिम तलाव बांधले असून सहा वाहनारूढ छोटे कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले आहेत. या तलावांमध्ये फक्त चार फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन करता येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळांच्या चार फुटांहून मोठ्या मूर्ती अंधेरी सात बंगला, वर्सोवा, मार्वे, जुहू या चौपाट्यांवर विसर्जनासाठी न्याव्या लागणार आहेत. दरम्यान, आरे कॉलनीतील कृत्रिम तलावांची व्यवस्था विसर्जनासाठी पुरेशी पडणार नाही. विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल व विसर्जनास विलंब होईल. ही बाब लक्षात घेऊन न्यायालयाच्या निर्देशानुसार जास्तीत जास्त कृत्रिम तलाव तातडीने उभारावेत, अशी मागणी भाजपतर्फे पालिकेकडे करण्यात आली आहे.दरवर्षी गोरेगावच्या आरे कॉलनीत गोरेगाव पूर्व-पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, मालाड पूर्व या भागांतील गणेशमूर्तींचे तीन मोठे नैसर्गिक तलाव आणि कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते. न्यायालयाच्या आदेशानुसार यावर्षी आरे वसाहतीमधील तीनही तलावांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेने कृत्रिम तलाव उभारण्यासाठी आरे प्रशासनाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. सुरुवातीला एक कृत्रिम तलाव उभारण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार छोटा काश्मीर परिसरातील पार्किंगच्या जागेत हा तलाव बांधण्यात आला आहे. या परिसरात मंगळवारी आणखी एक कृत्रिम तलाव बांधण्यात आला.गेल्या वर्षीपर्यंत आरे कॉलनीतील तीन नैसर्गिक तलावांमध्ये सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन केले जात होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार यंदापासून हे विसर्जन करता येणार नाही. दरम्यान, नागरिकांनी पालिकेने बांधलेले कृत्रिम तलाव, फिरते तलाव या ठिकाणीच गणेशमूर्ती विसर्जित कराव्‍यात, असे आवाहन पालिकेचे गोरेगाव पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त राजेश अक्रे यांनी केले आहे.गेल्या वर्षी ३,१०५ घरगुती व ३२६ सार्वजनिक अशा एकूण ३,४३१ गणेशमूर्तींचे विसर्जन आरे वसाहतीतील तीन नैसर्गिक तलाव आणि सात कृत्रिम तलावांमध्ये झाले होते. तसेच गेल्या वर्षी अनंत चतुर्दशी दिवशी ६९७ घरगुती व २०१ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. यावर्षी येथे दोन कृत्रिम तलाव आणि सहा वाहनारूढ छोटे कृत्रिम तलाव उपलब्ध असून ही व्यवस्था पुरेशी पडणार नाही. त्यामुळे अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाची सांख्यिकी माहिती घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा व अतिरिक्त गणेश विसर्जन तलाव उभारावेत, अशी मागणी भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.