
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, जातीनिहाय जनगणना, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, या मागण्यांसह सुरू झालेले आंदोलन आता आणखी तीव्र होत चालले आहे. शनिवारी नागपूर महामार्गावरील जनता कॉलेज चौकामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विधानपरिषद सदस्य आमदार सुधाकर अडबाले आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. ओबीसी कार्यकर्त्यांना पोलिसांनी मुख्यालयात स्थानबद्ध केले.ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावल्यानंतर शुक्रवारी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर विजय बलकी, प्रेमानंद जोगी हे अन्नत्याग आंदोलनाला बसले. यानंतर झालेल्या ओबीसी महासंघाच्या बैठकीत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता. आपल्या विविध मागण्यांसाठीच्या या आंदोलनांतर्गत स्थानिक जनता कॉलेज चौकात शनिवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ नागपूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.'राज्य सरकार ओबीसी विरोधी':जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आंदोलनाला राज्यातील अर्धे मंत्रीमंडळ भेट द्यायला गेले होते. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सोडविले. त्याचे आम्ही स्वागतच करतो. मात्र, दुसरीकडे ओबीसींच्या रास्त मागण्यांसाठी चंद्रपुरात रवींद्र टोंगे हे गेल्या १३ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. टोंगे यांची प्रकृती खालावली असतानाही एकही मंत्री आंदोलन सोडविण्यासाठी आले नाही. यामुळे राज्य सरकार हे ओबीसी विरोधी असल्याची टीका आमदार सुधाकर अडबाले यांनी यावेळी चक्काजाम आंदोलनाला संबोधित करताना केली.