
दुबई : भारताने वनडे वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली. पण हा वर्ल्ड कप भारताला जिंकता आला नाही. पण रोहित शर्माच्या नेतृत्वाचे यावेळी सर्वांनीच कौतुक केले. त्यानंतर आता आयसीसीने रोहित शर्माच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे. त्यामुळे आता कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आली आहे. रोहित शर्माची 'आयसीसी'ने सरत्या वर्षातील कामगिरीनुसार निवडलेल्या वनडे क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. रोहित शर्मासाठी हा सर्वात मोठा मान असेल. कसोटी संघाच्या कर्णधारपदी पॅट कमिन्सची निवड झाली आहे. मात्र, वर्ल्ड कप वनडे विजेत्या संघाचा कर्णधार कमिन्सला आयसीसीच्या सर्वोत्तम वनडे संघात स्थान नाही. पण या वनडे संघात रोहितबरोबरच पाच खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पण कसोटी संघात मात्र आयसीसीने फक्त दोन खेळाडूंनाच स्थान दिले आहे. वन-डे संघात रोहितसह महंमद शमी, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, विराट कोहली, कुलदीप यादव यांचा समावेश आहे. जागतिक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघातील अॅडम झाम्पा, ट्रॅव्हिस हेड यांनाच या संघात स्थान आहे. कसोटी संघात रवींद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोघा भारतीयांनाच स्थान आहे. जागतिक कसोटी विजेत्या संघातील उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्क या संघात आहेत. या संघात इंग्लंडच्या दोन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. इंग्लंडचे जो रुट आणि स्टुअर्ट ब्रॉड हे या कसोटी संघात पाहायला मिळत आहेत. यापूर्वी आयसीसीने टी-२० क्रिकेट संघ जाहीर केला होता. त्यानंतर आता वनडे आणि कसोटी संघ आयसीसीने जाहीर केले आहेत.वन-डे संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ट्रॅव्हिस हेड, विराट कोहली, डॅरिल मिचेल, हेन्रीच क्लासेन, मार्को यान्सेन, अॅडम झॅम्पा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी. कसोटी संघ : उस्मान ख्वाजा, दिमुथ करुणारत्ने, जो रूट, ट्रॅव्हिस हेड, रवींद्र जाडेजा, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, मिचेल स्टार्क, स्टुअर्ट ब्रॉड.