
बुलढाणा: जिल्ह्यातील संग्रामपूर शहरात आज दि. २३ जानेवारी रोजी दुपारी १ ते १:३० वाजताच्या दरम्यान धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने सुन आणि नातवाची निर्दयीरित्या हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तामगावं पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या संग्रामपूर शहरात नारायण गायकी (६५) यांनी घरातील सुन आणि नातवावर कुऱ्हाडीने सपासप वार करून त्यांना ठार मारल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत नातू समर्थ देवानंद गायकी (८) हा जागीच ठार झाला असून सून अश्विनी गणेश गायकी हि गंभीर जखमी झाली होती. त्या महिलेला रुग्णवाहिकेतून वरवट बकाल येथे नेण्यात आले होते. महिलेच्या डोक्यात जास्त मार लागल्याने तिला रुग्णवाहीकेमध्येच ठेऊन तपासण्यासाठी डॉक्टरांना नातेवाईकांनी हाक दिली. परंतु कोणीच डॉक्टर तेथे तपासण्यास आले नाहीत. त्यानंतर महिलेला पुढे शेगाव येथे नेण्यात आले. शेवटी तिचीही मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्या महिलेचा देखील मृत्यू झाला आहे. ही महिला ८ ते ९ महिन्याची गर्भवती असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी नारायण गायकी याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दिपक सोळंके करत आहे.