
नवी दिल्ली: धुके किंवा इतर कारणांमुळे विमानांना उशीर होण्याच्या घटना वाढल्या आहेत. राजधानी दिल्लीसह अन्य शहरात यामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे. रविवारी दिल्लीत १० विमानांचा मार्ग बदलण्यात आला तर १०० विमानांचे उड्डाण उशीराने झाले. यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतोच त्याच बरोबर मनस्ताप सहन करावा लागतो. दिल्ली विमानतळावर उड्डाणास विलंब झाल्याने एका प्रवाशाने पायलटवर हल्ला केला. या घटनेनंतर डायरेक्टर ऑफ सिव्हिल ऑफ एव्हीएशनने सोमवारी एक नवी SOP जाहीर केली आहे. या नव्या एसओपीनुसार जर एखाद्या फ्लाइटला तीन तासांपेक्षा अधिक वेळ उशीर होणार असेल तर संबंधित फ्लाइट रद्द करण्याची सूचना विमान कंपन्यांना देण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती एसएमएस, whatsapp किंवा ई-मेलवरून द्यावी असे डीजीसीएने म्हटले आहे. या नव्या एसओपीचे सर्व विमान कंपन्यांनी तातडीने पालन केले पाहिजे असे देखील सांगण्यात आले आहे. सर्व विमान कंपन्यांनी उड्डाणाच्या विलंबाबाबत अचूक रियल टाइम माहिती प्रवाशांसोबत शेअर केली पाहिजे. विमानतळावरील धुक्यामुळे जर विलंब होत असेल तर प्रवाशांशी तसा योग्य संवाद साधला पाहिजे. यासाठी विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशील असावे असे DGCAने म्हटले आहे. फ्लाइट रद्द होणे किंवा त्यांना विलंब लागल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यामुळेच ही नवी SOP जाहीर केल्याचे DGCAने सांगितले.दरम्यान, या प्रकारावर नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. ‘डीजीसीए प्रतिकूल हवामानामुळे उड्डाणे रद्द करणे आणि विलंबामुळे होणारी गैरसोय कमी करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी विमान कंपन्यांसाठी आदर्श परिचालन कार्यपद्धती लवकरच जारी करण्यात येईल’, अशी माहिती शिंदे यांनी दिली. खराब हवामानाचा १० उड्डाणांना फटकापुणे: उत्तरेतील दाट धुक्यामुळे पुण्यातून दिल्लीसह राजकोट, प्रयागराज, अहमदाबादकडे जाणाऱ्या नऊ विमानांचे उड्डाण रविवारी सकाळी रद्द करण्यात आले. याशिवाय चेन्नईकडे जाणारेही विमान रद्द झाले. दिल्लीला जाणाऱ्या अनेक विमानांना उशीर झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळे तेथील अनेक शहरांमध्ये पहाटेपासून दाट धुके पडत आहे. दिल्लीतील दाट धुक्यामुळे अनेक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. त्यामुळे पुण्यातून दिल्लीसह इतर शहरांमध्ये जाणारी १० विमाने रद्द झाली. सकाळी दहानंतर धुके कमी झाल्यावर सेवा पूर्ववत झाली.पुण्यातून सर्वाधिक विमाने दिल्लीसाठी उड्डाण करतात. मात्र, धुक्यामुळे विमानसेवेचे वेळापत्रक गडबडल्याचा फटका अनेक प्रवाशांना बसला. काही प्रवाशांची दिल्लीतून परदेशात जाणारी विमाने चुकली. विमाने रद्द झाल्यामुळे पुणे विमानतळावर रविवारी सकाळी गर्दी झाली होती. विमान कंपन्यांनी पुढील विमानांमध्ये प्रवाशांची सोय केली; तसेच, तिकीट रद्द करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला.