
म. टा. प्रतिनिधी, पुणे:'महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांमध्ये विरोधी पक्षातील नेते प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. आगामी काळात महाराष्ट्राला मोठे राजकीय हादरे बसतील,' असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी रविवारी केला; तसेच 'पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी आणि आमचा विचार स्वीकारणाऱ्यांसाठी भाजपचे दरवाजे खुले आहेत,' असेही त्यांनी स्पष्ट केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 'हर मंदिर स्वच्छता' या देशव्यापी अभियानाचा राज्यातील शुभारंभ शिवाजीनगर गावठाणातील रोकडोबा मंदिर परिसरात केल्यानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'राज्यात जिल्हानिहाय महायुतीचे मेळावे आजपासून सुरू झाले असून, पुढच्या काळात बूथ आणि विभागीय स्तरावर या मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे,' अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.'उद्धव ठाकरेंना मत म्हणजे......''काँग्रेस पक्षाने नेहमी देशातील हिंदू समाजाचा अपमान केला असून, अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावरही बहिष्कार टाकला आहे. सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडताना काँग्रेसने रामाचा जन्म काल्पनिक असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते. 'इंडि' आघाडी सत्तेत आल्यास भारतातील सनातन धर्म संपविण्याची भाषा उदयनिधी स्टॅलिन यांनी केली आहे. उद्धव ठाकरे या आघाडीचे घटक आहेत. याचाच अर्थ ठाकरेंना मत म्हणजेच हिंदू सनातन धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत असा होतो,' अशी टीका बावनकुळे यांनी केली.महिलांचा सहभाग लक्षणीय'शिवाजीनगर गावठाणातील रोकडोबा मंदिर परिसरात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत स्वच्छता करण्यात आली. हर मंदिर स्वच्छता अभियानात देशातील जनता उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे. यात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना हा कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले असून, सर्व राजकीय पक्षांनी त्यात सहभागी होणे अपेक्षित आहे,' असे बावनकुळे म्हणाले. आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष आणि राममंदिर अभियानाचे राज्याचे संयोजक राजेश पांडे, सुनील देवधर या वेळी उपस्थित होते.