
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जीएसटी काउंसिलची एक बैठक पार पडली. या बैठकीत जीएसटी संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. जसं की जीएसटीतील 12 आणि 28 टक्के हे स्लॅब काढून टाकण्यात आले आहेत. याचा परिणाम अनेक वस्तूंवर होणार आहे. बऱ्याच वस्तू स्वस्त झालेल्या पाहायला मिळणार आहेत. नव्या बदलाची अमंलबजावणी 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ही माहिती दिली आहे.
नव्या बदलानुसार रेस्टॉरंटमधलं जेवणावर काय परिणाम होणार?
दरम्यान जीएसटी काउंसिलने रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि विमान प्रवास यासारख्या क्षेत्रांवर मोठ्या कर सुधारणा केल्या आहेत. हे बदल देखील 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहेत. पण या नव्या बदलानुसार रेस्टॉरंटमधलं जेवणावर काय परिणाम होणार आहे, म्हणजे जेवण महाग होणार की स्वस्त? तसेच विमान प्रवासावरही काय परिणाम होणार का? चला जाणून घेऊयात.
रेस्टॉरंटमध्ये जेवण स्वस्त होणार की महाग?
पूर्वी रेस्टॉरंटमध्ये खाण्यावर कर 12 % ते 18 % पर्यंत होता. पण आता जीएसटी 5 % पर्यंत कमी करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की बाहेर खाणे, कुटुंबासह जेवण करणे, मित्रांसोबत पार्टी करणे किंवा सणांमध्ये बाहेर जाणे हे आता थोड्याफार फरकाने का होईना पण स्वस्त होणार आहे. खिशाला नक्कीच परवडणारं असणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा असा देखील होणार आहे, की जास्त जीएसटीमुळे मागणी कमी होत असताना रेस्टॉरंट उद्योगांना पुन्हा एकदा वेग मिळणार आहे. तसेच याचा फायदा थेट सामान्य कुटुंबे, मध्यमवर्गीय प्रवासी आणि लहान व्यावसायिकांना देखील होणार आहे.
विमान प्रवासावर नव्या बदलाचा काय परिणाम होणार? महाग की स्वस्त?
देशांतर्गत प्रवासी आणि व्यावसायिक प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. आता इकॉनॉमी क्लास तिकिटांवर 5% जीएसटी आकारला जाईल, जो पूर्वी 12% होता. दुसरीकडे, बिझनेस क्लास तिकिटांवरील जीएसटी 18% वरून 12% पर्यंत कमी करण्यात आला आहे. सण आणि सुट्ट्यांच्या काळात, जेव्हा विमान तिकिटांची मागणी वेगाने वाढते, तेव्हा या सवलतीमुळे प्रवाशांचे बजेट हलके होणार आहे परिणामी विमान प्रवास आता सोपा आणि खिशाला परवडणारा होणार आहे. हे बदल केवळ खिसा हलका करण्यापुरते मर्यादित नाहीत. सरकारचे उद्दिष्ट आहे की या कपातीमुळे सेवा क्षेत्रात, विशेषतः रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि विमान वाहतूक क्षेत्रात वापर वाढेल. महामारीच्या काळात आणि त्यानंतर या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसला होता.
तसेच केसांचे तेल, साबण, सायकलही स्वस्त होणार
ज्या वस्तूंवर जीएसटी 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे त्यात केसांचे तेल, टॉयलेट साबण, साबण बार, शाम्पू, टूथब्रश, टूथपेस्ट, सायकल, टेबलवेअर, स्वयंपाकघरातील भांडी आणि इतर घरगुती वस्तूंचा समावेश आहे. दूध, ब्रेड आणि पनीरवरील जीएसटी 5% वरून 0% पर्यंत कमी करण्यात आला आहे. सर्व भारतीय ब्रेडवरील जीएसटी 0% असेल, म्हणजेच रोटी असो किंवा पराठा असो किंवा काहीही असो, त्या सर्वांवर जीएसटी 0% असेल. नमकीन, बुजिया, सॉस, पास्ता, इन्स्टंट नूडल्स, चॉकलेट, कॉफी, संरक्षित मांस, कॉर्नफ्लेक्स, बटर, तूप या सर्वांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून वरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.