
आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा यूएईकडे आहे. या स्पर्धेत 8 संघ भिडणार आहेत. या 8 संघांची 4-4 प्रमाणे 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, यूएई आणि ओमान हे 4 संघ अ गटात आहेत. तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि हाँगकागँचा समावेश आहे. भारतीय संघ सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात या स्पर्धेत खेळणार आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना हा यजमान यूएई विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत भारताचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या याच्याकडे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांच्या पंगतीत स्थान मिळवण्याची संधी आहे.
स्टार ऑलराउंडर हार्दिक याला भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये 100 षटकार लगावणारा चौथा फलंदाज होण्याची संधी आहे. आतापर्यंत भारतासाठी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली या तिघांनीच 100 पेक्षा अधिक षटकार लगावले आहेत.