
रियान पराग याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स टीमने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील क्वालिफायर 2 मध्ये (IPL 2026 Qualifier 2) धडक देत ट्रॉफीच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं आहे. राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल या दोघांनी केलेल्या विस्फोटक खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादसमोर 244 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हैदराबादला विजयी धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरही खेळता आलं नाही. हैदराबादने राजस्थानच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. राजस्थानने हैदराबादला 19.2 ओव्हरमध्ये 196 रन्सवर ऑलआऊट केलं. राजस्थानने यासह क्वालिफायर 2 चं तिकीट मिळवलं. तर हैदराबादचं पराभवासह पॅकअप झालं.
राजस्थानकडून विजयासह पराभवाची मालिका खंडीत
राजस्थान रॉयल्सने हैदराबादला पराभूत करुन मोठा कारनामा केला आहे. राजस्थानने हैदराबाद विरुद्ध पराभवाची मालिका खंडीत केली आहे. हैदराबादने याआधी राजस्थान रॉयल्स विरुद्ध सलग 6 सामने जिंकले होते. मात्र राजस्थानने एकाच विजयासह पराभवाची मालिका खंडीत केली आणि हैदराबादला 19 व्या मोसमातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.