
टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड-11… हे वाचून तुम्हालाही एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट आठवली असेल ना? जणू काही आपली टीम इंडिया एकटीच संपूर्ण जगाशी पंगा घेणार आहे. पण क्रिकेट चाहत्यांनो, हे आता फक्त कल्पनेत नाही, तर प्रत्यक्षात मैदानावर पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. जर बीसीसीआयचा मास्टरप्लॅन यशस्वी ठरला, तर आगामी काळात टीम इंडिया थेट जगातील सर्वोत्तम खेळाडूंच्या वर्ल्ड-11 शी भिडताना दिसेल.
नुकतीच 18 सप्टेंबरला मुंबईत बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या बैठकीत भारतीय क्रिकेटच्या भविष्याबाबत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. पण यातला सर्वात लक्षवेधी आणि क्रिकेटप्रेमींची उत्सुकता ताणणारा निर्णय म्हणजे बीसीसीआयच्या शताब्दी वर्षाचं जंगी सेलिब्रेशन! डिसेंबर 2028 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला तब्बल 100 वर्षे पूर्ण होत आहेत. हा ऐतिहासिक टप्पा दणक्यात साजरा करण्यासाठी बीसीसीआयने कंबर कसली आहे. यासाठीच डिसेंबर 2027 ते डिसेंबर 2028 असं सलग एक वर्ष या शताब्दीचा उत्सव वेगवेगळ्या अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.
याच निमित्ताने एक एका खास सामन्याची योजना आखली जात आहे. आनंद बाजार पत्रिकाने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय डिसेंबर 2028 मध्ये इंडिया-11 विरुद्ध वर्ल्ड-11 असा एक अटीतटीचा आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा महामुकाबला आयोजित करण्याच्या तयारीत आहे. जगभरातील तगड्या आणि सर्वोत्तम खेळाडूंना एकत्र करून ही वर्ल्ड-11 ची टीम बांधली जाईल. सध्या यावर प्राथमिक चर्चा सुरू आहे. या सामन्याचा फॉरमॅट कोणता असेल किंवा तो कोणत्या स्टेडियमवर खेळवला जाईल, हे अद्याप गुलदस्त्यातच असलं तरी चाहत्यांसाठी ही एक मोठी पर्वणीच ठरणार आहे.
विशेष म्हणजे, बीसीसीआय असा ऐतिहासिक प्रयोग पहिल्यांदाच करत नाहीये. याआधी जेव्हा बीसीसीआयने आपली ‘प्लॅटिनम ज्युबली’ साजरी केली होती, तेव्हाही कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात असाच एक हाय-व्होल्टेज वनडे सामना खेळवण्यात आला होता. त्यामुळे आता 100 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने बीसीसीआय कोणता नवा धमाका करणार आणि या इंडिया विरुद्ध वर्ल्डच्या संभाव्य महामुकाबल्याची अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.