थकलेले एकमेकांना आधार देऊ शकतात, राज्याला नाही: मोदी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 13, 2019

थकलेले एकमेकांना आधार देऊ शकतात, राज्याला नाही: मोदी

https://ift.tt/33qBqNN
जळगाव: यांनी आज जळगावमधील प्रचारसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीसह यांच्यावर निशाणा साधला. थकलेले साथीदार एकमेकांचा आधार बनू शकतात, पण महाराष्ट्राची स्वप्ने आणि येथील तरुणांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्याचे माध्यम होऊ शकत नाहीत, असं सांगत मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचंही कौतुक केलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं प्रचार रण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जळगावमध्ये पहिलीच सभा झाली. त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. त्यांनी प्रमुख विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करतानाच, त्यांनी जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन, कलम ३७०, तिहेरी तलाक या मुद्द्यांवरून विरोधकांना लक्ष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी दोन्ही पक्षांची खिल्ली उडवली. 'थकलेले साथीदार एकमेकांचे आधार होऊ शकतात, पण महाराष्ट्राची स्वप्ने आणि येथील युवकांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्याचे माध्यम होऊ शकत नाही,' असं ते म्हणाले. हिंमत असेल तर कलम ३७० पुन्हा लागू करून दाखवा! नरेंद्र मोदी यांनी यावेळी विरोधकांना खुलं आव्हान दिलं. हिंमत असेल तर विरोधकांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मोदी सरकारने हटवलेलं कलम ३७० पुन्हा लागू करून दाखवण्याचं आश्वासन द्यावं. विरोधकांनी नकराश्रू ढाळणं बंद करावं. लोकांना ते मूर्ख बनवत आहेत. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी कलम ३७० पुन्हा लागू करावं आणि तसं करण्याचा प्रयत्न केला तर ते वाचतील का? त्यांचं राजकीय अस्तित्व राहील काय? असं मोदी म्हणाले. तुमच्यात हिंमत असेल तर तिहेरी तलाक पुन्हा लागू करून दाखवा, असं आव्हानही त्यांनी दिलं. शरद पवारांची उडवली खिल्ली नरेंद्र मोदी यांनी यावेळी शरद पवार यांच्या एका सभेतील व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करत त्यांची खिल्ली उडवली. आमच्या व्यासपीठावर युवा नेते आहेत. आम्ही आताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला. एक नेते सोफ्यावर बसले होते. त्यांच्या पक्षाचे नेते बाजूला आहेत. तीन-चार जणांनी त्यांना हात देऊन उभे केले. त्यांना माळा घातली. एका युवा नेत्यानं त्यात मान घातली. इतके मोठे नेते की ते आयुष्यभर टीव्ही, वर्तमानपत्रांत झळकले. या इतक्या मोठ्या नेत्याचं मन इतकं लहान आहे की त्यांनी त्या युवा नेत्याच्या डोक्यावर कोपरा मारून त्याला बाजूला केलं. आपल्या युवा नेत्यांना जे सोबत घेऊन जात नाहीत, ते महाराष्ट्राला काय पुढे घेऊन जातील, अशी टीका त्यांनी केली. मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे: चार महिन्यांपूर्वी तुम्ही एक समर्थ आणि सशक्त नव्या भारताच्या निर्माणासाठी मतदान केलं होतं. तुम्ही अशा एक भारतासाठी जनादेश दिला होता, तो जगात आपलं स्थान निर्माण करू शकेल. १३० कोटी भारतीयांची स्वप्ने आणि अपेक्षांच्या पूर्तीसाठी पाऊल उचलणाऱ्या भारतासाठी जनादेश दिला होता. नव्या भारताचा नवा जोश आज जगालाही दिसत आहे. आज जगभरात भारताची वाहवा होत आहे त्यामागे केवळ १३० कोटी जनता आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारताच्या भावनांनुसार, गेल्या काही महिन्यांपासून आम्ही अनेक दशकांपासून समोर असलेल्या आव्हानांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहोत. पाच ऑगस्टला भाजप-एनडीए सरकारनं एक अभूतपूर्व निर्णय घेतला. त्याविषयी विचार करणंही अशक्य होतं. जम्मू-काश्मीर आणि लडाख आपल्यासाठी केवळ जमिनीचा तुकडा नाही तर भारतमातेचं मस्तक आहे. जेव्हा शेजारील नापाक शक्ती जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी आणि तेथे रक्तपात घडवण्यासाठी वक्रदृष्टी ठेवून आहेत त्यावेळी आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने काही ठोस पावलं उचलली आहेत. दुर्दैवानं सांगावं लागतं की, आपल्या देशातील काही राजकीय पक्ष, काही नेते राष्ट्रहितासाठी घेतलेल्या निर्णयांवर राजकारण करत आहेत. हे राजकीय पक्ष महाराष्ट्रातही मते मिळवण्यासाठी तुमच्याकडे येत आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाखसंबंधी देश जो विचार करतो त्याच्या उलट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे विचार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी केलेली वक्तव्ये पाहा. जम्मू-काश्मीर आणि लडाखसंबंधी घेतलेला निर्णय हा भाजपच्या संस्कारांचा आरसा आहे. आमचं वचन आणि उद्देशही स्पष्ट आहे. दिलेली आश्वासनं पाळण्याची धमक आमच्यात आहे. तुम्ही संधी दिलीत तर महाराष्ट्रात स्थिर सरकार देऊ असं वचन मी पाच वर्षांपूर्वी दिलं होतं. पारदर्शक सरकार मिळेल असं आश्वासन दिलं होतं. गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्राला विकास आणि विश्वासाच्या मार्गावर नेण्याचं काम केलं. रस्ते, सिंचन व्यवस्था, शिक्षण, आरोग्य अशा प्रत्येक क्षेत्रांत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही केलेल्या कामांमुळं विरोधकही हैराण झाले आहेत. जळगावसह हा संपूर्ण भाग रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने जोडण्याचे काम सुरू आहे.