अजित पवारांना फोडल्याचा डाव भाजपवर उलटलाः राऊत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 24, 2019

अजित पवारांना फोडल्याचा डाव भाजपवर उलटलाः राऊत

https://ift.tt/2D7ZhHb
मुंबईः राष्ट्रवादीचे नेते यांना फोडणे हा भाजपचा शेवटचा डाव होता. परंतु, हा डाव त्यांच्यावरच उलटला आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर शरसंधान साधले. राज्याचे मुख्यमंत्री शपथ घेतात परंतु, राज्याला हे माहिती होत नाही. यापेक्षा राज्याचे दुर्दैव काय आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला विश्वासात न घेता शपथ घेणे म्हणजे राज्यासाठी व देशासाठी हा काळा दिवस आहे. देशातील कोणत्याही राज्याने असा काळा दिवस याआधी पाहिला नव्हता. देशाच्या आणीबाणीपेक्षाही हा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. भाजपने सचोटीने व्यापार करायला हवा होता. परंतु, यावेळी भाजपचा व्यापार चुकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाला तडे देण्याचे काम नेत्यांकडून केले गेले आहे. भाजपच्या नेत्यांनी आता झोपेतून उठावे. कारण अजित पवारांना सोबत घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. ही त्यांच्या अंगलट येणार आहे. राष्ट्रवादीचे जवळपास सर्व आमदार परतले आहेत. अजित पवार यांच्याकडे आता केवळ ३ ते ४ आमदार उरले आहेत. या तीन ते चार आमदारांच्या बदल्यात भाजपने अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद दिले असावे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. अजित पवारांना फोडणे हा भाजपचा अखेरचा डाव होता व हा डाव भाजपवर उलटला आहे. त्यामुळे भाजप बहुमत सिद्ध करू शकणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. भाजपने राजभवनाचा काळाबाजार केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. महाआघाडीसोबत सध्याच्या घडीला १६५ आमदार आहेत. राज्यपालांनी आम्हाला आता बोलावल्यास महाआघाडी १० मिनिटांत बहुमत सिद्ध करू शकते, असा दावा संजय राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी लाडू खाल्ले. पण हे लाडू त्यांच्या घशाखाली उतरले नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले. दरम्यान, राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षाचं सरकार अस्तित्वात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असताना शनिवारी सकाळी भाजपने राजकीय सर्जिकल स्ट्राइक लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात राज्यपालांनी या दोन्ही नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. अजित पवार यांना राष्ट्रवादीतील २२ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, त्यांना किती आमदारांचा पाठींबा आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. शरद पवार यांनी अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केल्याने राज्याच्या राजकारणात आणखी नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.